तिवसा तालुक्यातील धोत्रा तलावातून बेकायदा पाणी उपसा उघड

महसूल विभागाच्या कारवाईने उडाली खळबळ

तिवसा/25 नोव्हेंबर– शासकीय धोत्रा सिंचन तलावातून वारंवार ताकीद देऊनही बेकायदा पाणी उपसा करणार्‍या शेतकर्‍यावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली. तळेगाव ठाकूर येथील मंजीत किसनराव शेंडे याच्याविरुद्ध तिवसा पोलीस ठाण्यात आज प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला असून महागडे साहित्य जप्त केले.
तिवसा तालुक्यातील मौजा तिवसा भाग दोन येथील शासकीय धोत्रा सिंचन तलावातून पूर्वपरवानगी न घेता पाणी उपसा सुरू होता. याबाबत मंडळ अधिकारी चंद्रशेखर आर. आगरकर आणि ग्राम महसूल अधिकारी पी. डी. वाट यांनी 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पंचासमक्ष घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी तळेगाव ठाकूर येथील शेतकरी मंजीत किसनराव शेंडे याने तलावात बारा ते पंधरा फूट खोल खड्डा खोदून पाणी उपसा सुरू ठेवल्याचे आढळले. त्यादिवशी अधिकार्‍यांनी साहित्याची जप्ती करून संबंधित शेतकर्‍याला सक्त ताकीद दिली होती. सक्त ताकीद देऊनही शेंडे याने शासकीय आदेशाची जाणूनबुजून अवज्ञा करत 23 नोव्हेंबर आणि आज 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा त्याच तलावातून पाणी उपसा सुरूच ठेवला. त्यामुळे आज दुपारी एक वाजता अधिकार्‍यांनी पंचासमक्ष पुन्हा पाहणी करत उर्वरित साहित्य जप्त करून तिवसा तहसील कार्यालयात जमा केले.
तहसीलदार तिवसा यांच्या प्राधिकार पत्रान्वये मंडळ अधिकारी चंद्रशेखर आर. आगरकर यांनी तिवसा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक गोपाल शिवराम उपाध्ये यांच्या मार्गदर्शनात ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील कलम दोनशे तेवीस अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार निलेश महादेवराव जामनिक करत आहेत. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे तालुक्यात बेकायदा पाणी उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. धडक कारवाईतील जप्त साहित्याचा तपशील या संपूर्ण कारवाईदरम्यान महसूल पथकाने पाच अश्वशक्तीची पाणबुडी विद्युत मोटार पंप तसेच तीन अश्वशक्तीचा सौर विद्युत मोटार पंप जप्त केला आहे. याशिवाय तलावातून पाणी खेचण्यासाठी वापरलेले एकूण सहासष्ट सिंचन नळ्या आणि साडेतीनशे मीटर लांबीची वीज वाहक तार असा मोठा मुद्देमाल ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

Back to top button