महाराष्ट्रात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक
नवी मुंबई विमानतळ परिसरात नव्या शहरांची उभारणी

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
मुंबई /25 नोव्हेंबर: पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, बोगदे आणि अन्य पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी, तर विरार ते वाढवण परिसरात चौथी मु ंबई विकसित करण्याचे नियोजन आहे. शहरांकडे समस्येच्या दृष्टिकोनातून न पाहता आर्थिक विकासाची इंजिने म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त मु ंबईत आयोजित तिसर्या जागतिक महापौर परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह देश-विदेशातील महापौर, नगरप्रशासक आणि शहरी विकास क्षेत्रातील प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शहरांचा वाटा सुमारे 65 टक्के आहे. महाराष्ट्र ाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या सुमारे 400 शहरांमध्ये राहते. त्यामुळे शहरांचा नियोजनबद्ध विकास केल्यास राज्याच्या आर्थिक प्रगतीबरोबरच मोठ्या लोकसंख्येच्या राहणीमानात सुधारणा होऊ शकते. यापूर्वी शहरीकरणाला समस्या मानून ते रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नियोजनाअभावी झोपडपट्ट्या, अपुर्या नागरी सुविधा, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण झाले. शहरीकरण ही समस्या नसून विकासाची संधी आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर मांडली आणि त्यानुसार शहरी विकासाला दिशा मिळाली, असे फडणवीस म्हणाले. नवी मुंबई विमानतळ परिसरात विकसित होणार्या तिसर्या मुंबईत एज्यु-सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सिटी उभारण्यात येणार आहे. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांची क्षमता असलेली शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजन असून, 12 जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस येथे उभारले जाणार आहेत. त्यापैकी सात विद्यापीठांनी कामकाज सुरू केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विरार ते वाढवण परिसरात चौथी मु ंबई विकसित करण्याची योजना आहे.





