अरविंदबाबू देशमुख यांना अभिवादन
प्रशासकीय पाहुणे आणि आदर्श ग्राहकांचा सत्कार

* बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत स्मृतींना उजाळा
अमरावती/14 मे- सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व स्वर्गीय अरविंदबाबू देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावती येथील अरविंद सहकारी बँकेच्या शाखेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अरविंदबाबूंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे पालक संचालक प्रकाशदादा भकमपुरे होते. या सोहळ्यात अमरावती वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांतजी देशमुख, अमरावती महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक अनिलजी अग्रवाल आणि भोजराजजी काळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर बँकेच्या वतीने सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बँकेच्या दोन आदर्श ग्राहकांचा करण्यात आलेला सन्मान. यामध्ये अनिलजी अग्रवाल, डॉ. विक्रमजी वसू, सौ. कल्याणी वसू आणि सुरेंद्रजी चोरडिया यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी बँकेच्या कार्याचे कौतुक केले. अनिलजी अग्रवाल, भोजराजजी काळे आणि अॅड. प्रशांतजी देशमुख यांनी आपल्या मनोगतातून बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्रकाशदादा भकमपुरे यांनी उपस्थितांना अरविंदबाबू देशमुख यांच्या जीवनप्रवासाची माहिती दिली. बँकेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत रणजितबाबू देशमुख, आ. आशिषराव देशमुख आणि भाऊसाहेब भोगे यांनी घेतलेल्या कष्टांचा त्यांनी विशेष गौरव केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेचे संचालक प्रा. डॉ. मिलिंद पाटील यांनी प्रास्ताविकातून बँकेची आर्थिक स्थिती आणि उलाढालीचा सविस्तर अहवाल मांडला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी देशमुख यांनी केले, तर अक्षय जुनघरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे व्यवस्थापक सागर बोपले यांच्यासह सर्व कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला.




