न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये विशिष्ट समुदायाला झुकते माप?
माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचे राष्ट्रपतींना पत्र

नवी दिल्ली /27 नोव्हेंबर : भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गवई यांनी असा आरोप केला की, कॉलेजियमच्या अलीकडील शिफारशींमध्ये एका विशिष्ट समुदायाला स्पष्टपणे प्राधान्य दिले जात आहे. यासोबतच, कॉलेजियमच्या कामकाजाच्या पद्धती आता टीकेच्या भोवर्यात सापडल्या आहेत.न्यायमूर्ती गवई यांनी कॉलेजियमच्या अलीकडील शिफारशींच्या संदर्भात राष्ट्रपतींना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी संसदेतील आकडेवारीचाही उल्लेख केला आहे. तसेच गवई यांनी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवले आहे. न्यायमूर्ती गवई यांचा आरोप आहे की, कॉलेजियमच्या अलीकडील शिफारशी केवळ एका समुदायाला झुकते माप देणार्या आहेत. तर दुसरीकडे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक समुदाय, महिला आणि इतर ‘प्रगत’ (सर्वसाधारण प्रवर्ग) जातींमधील उमेदवारांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
संसदेतील आकडेवारीचा हवाला देत गवई यांनी आपल्या पत्रात लिहिले की, 2018 पासून उच्च न्यायालयांमध्ये नियुक्त झालेल्या 715 न्यायाधीशांपैकी केवळ 22 जण अनुसूचित जातीचे, 16 जण अनुसूचित जमातीचे, 89 जण इतर मागासवर्गीय (जइउ) आणि 37 जण अल्पसंख्याक समुदायातील आहेत. तसेच प्रत्येक चार न्यायाधीशांपैकी तीन न्यायाधीश सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. विशेष म्हणजे जानेवारी 2021 ते जानेवारी 2026 या काळात झालेल्या नियुक्त्यांपैकी सुमारे 80 टक्के नियुक्त्या ‘प्रगत’ समुदायांमधून झाल्या आहेत, तर इतर मागासवर्गीयांना (जइउ) 14 टक्क्यांपेक्षा कमी वाटा मिळाला आहे, अशी माहिती गवई यांनी दिली.न्यायमूर्ती गवई यांनी असाही आरोप केला की, एक विशिष्ट समुदाय ज्याची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहे, तो सर्वोच्च न्यायालयातील 40 टक्क्यांहून अधिक पदांवर विराजमान आहे. त्यांनी या परिस्थितीचे वर्णन सतत वाढत जाणारी आणि आता क्षम्य नसलेली अशी केली आहे. तसेच न्यायाधीशांच्या बदल्यांचा मुद्दाही उपस्थित करत न्यायमूर्ती गवई म्हणाले की, ज्या मुख्य न्यायाधीशांना लहान उच्च न्यायालयांमध्ये पाठवण्यात आले होते, त्यांची आता एका मोठ्या उच्च न्यायालयासाठी शिफारस केली जात आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्यासाठी जागा मोकळी करण्याकरिता एका पात्र मुख्य न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.
मी स्वत: कॉलेजियमचा सदस्य होतो
न्यायमूर्ती गवई यांनी कबूल केले की, हे निर्णय घेतले गेले तेव्हा ते स्वतः ‘कॉलेजियम’चे सदस्य होतो. त्यामुळे या अपयशाची काही जबाबदारी आपल्या सर्वांवरच आहे. मात्र, योग्य प्रक्रिया आणि औचित्याचा हवाला देत त्यांनी या निर्णयामागची कारणे उघड करण्यास नकार दिला. तसेच गवई यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, ‘कॉलेजियम’ला दिलेले प्राधान्य म्हणजे त्यांना उत्तरदायित्वापासून मुक्त करणे नव्हे. राज्यघटनेच्या कलम 124(2) अंतर्गत राज्यघटनेचे रक्षण करण्याची जी जबाबदारी ‘कॉलेजियम’वर आहे, त्यातून त्यांना मुक्त करता येणार नाही.





