डिलिमिटेशन विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करु
पक्षाच्या बैठकीत राहुल गांधी यांचा निर्धार

आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक
नवी दिल्ली/27 नोव्हेंबर : केंद्र सरकारकडून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. 30 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरपर्यंत लोकसभेचं अधिवेशन चालणार आहे. तर 2 आणि 3 डिसेंबरला राज्यसभेचं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे आज या विशेष अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संसदीय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती समोर आली आहे. आम्ही गेल्या वेळेस जसे प्रयत्न केले होते, तसेच हे विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करु असं मोठं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आजच्या पक्षाच्या बैठकीत केलं.
काँग्रेस पक्षाची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही गेल्या वेळेस जसे प्रयत्न केले होते, तसेच हे विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करु असे राहुल गांधी म्हणाले. प्रत्येक विरोधी पक्षाला सोबत घेण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु मात्र बर्याच गोष्टी पक्षांच्या भूमिकेवरही अवलंबून आहेत असे राहुल गांधी म्हणाले. बर्याच गोष्टी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यासह इतर काही जणांवर अवलंबून आहेत असे राहुल गांधी म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन येत्या 30 नोव्हेंबरपासून सुरू होत असून, त्यात परिसीमन आणि महिला आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे. केंद्र सरकारने परिसीमनाशी संबंधित विधेयकाला आजच (दि. 27) मंजुरी दिली आहे. लोकसभेतील जागा प्रत्येक राज्यात 50 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या संसदीय रणनीती समितीच्या बैठकीत विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय स्पष्ट केला. विरोधकांकडे विधेयक रोखण्यासाठी पुरेसे संख्याबळ असो किंवा नसो, काँग्रेस प्रत्येक स्तरावर विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. भाजप स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हे विधेयक आणत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. त्यात लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षाचे खासदार सहभागी झाले होते. बैठकीनंतर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी परिसीमनाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. या विषयावर पक्ष आपल्या मागण्यांशी तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, 30 नोव्हेंबरला लोकसभेत चर्चेसाठी येणारी विधेयके 27 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत खासदारांना देण्यात आली नव्हती. विधेयकांचा मजकूर न दाखवता चर्चा घाईने घडवून आणणे चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. महिला आरक्षण सध्याच्या 543 लोकसभा जागांमध्येच लागू करावे, अशीही पक्षाची मागणी आहे





