पुण्यात गुन्हेगारी खपवून घेणार नाही
सुनेत्रा पवारांनी पोलीस अधिकार्यांना सुनावले

पुणे/27 नोव्हेंबर – पुणे शहर आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहावे. गुन्हेगारी प्रवृत्ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोयता गँग, ड्रग्ज माफिया आणि अवैध शस्त्रे बाळगणार्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पोलिस प्रशासनाला दिले.
शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील हल्ल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगून सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी आधीपासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा. गुन्हेगारी हालचालींची माहिती मिळवणारी यंत्रणा अधिक सक्षम करावी. शहरातील सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी. अवैध शस्त्रे बाळगणार्यांसह कोयता गँग आणि अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असणार्यांवर कठोर कारवाई करावी. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठीही आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. न्यायालय परिसरातील घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. मात्र, या घटनेतून पोलिसांनी धडा घेऊन कामकाजात सुधारणा करावी. आगामी काळात पोलिसांचा धाक आणि दबदबा नागरिकांना दिसला पाहिजे, असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.पुण्याची शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावीपणे काम करावे. यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्था वाढवावी. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी. वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पोलीस विभागाने आपली कार्यक्षमता आणि कामगिरी अधिक उंचावण्याची गरज असल्याच्या सूचनाही सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिल्या. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी पोलीस दल निश्चितपणे आपल्या कामगिरीत सुधारणा करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच पोलीस दलाचा धाक आणि दबदबा आगामी काळात नागरिकांना निश्चितपणे दिसून येईल, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.





