ग्रामीण विकासाचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत

सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर, तिवसा व भातकुली

पंचायत समित्यांच्या कामांचा आ. राजेश वानखडे यांनी घेतला आढावा

अमरावती /27 नोव्हेंबर- ग्रामीण भागाचा विकास गतिमान करण्यासोबतच सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आ. राजेश वानखडे यांनी अमरावतीच्या बचत भवनात तिवसा व भातकुली पंचायत समित्यांच्या कामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची प्रगती, योजनांची अंमलबजावणी, गावांमधील मूलभूत सुविधांची स्थिती आणि नागरिकांच्या समस्या यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधताना नियोजन, प्रशासकीय समन्वय आणि कामांचा नियमित पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गावांमध्ये विकासकामे करताना ग्रामपंचायतींना सक्षम बनविणे, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. योजनांची अंमलबजावणी करताना येणार्‍या अडचणी, निधीचा वापर आणि कामातील त्रुटींवरही चर्चा झाली. यावेळी तिवसा तहसीलदार मयूर कलसे, गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, प्रदीप गौरखेडे, विवेक बिड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गावांच्या विकासाचा कृती आराखडा

ग्रामपंचायतींच्या विकास कामांना गती देणे, सरकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे, स्वच्छता व पाणीपुरवठ्याला प्राधान्य देणे, आरोग्य आणि शिक्षण सुविधांचा आढावा घेणे, तसेच गावातील समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.

Back to top button