औषध विक्रेत्यांचा 20 ला देशव्यापी बंद
जिल्ह्यात औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज

नियंत्रण कक्ष स्थापन
अमरावती /14 मे: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ बुधवार, दिनांक 20 मे 2026 रोजी एक दिवसीय देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमध्ये देशातील ठोक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असून, त्यांनी आपले व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत आणि अखंडपणे उपलब्ध व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असल्याची माहिती अमरावतीचे सहाय्यक आयुक्त (औषधे) डॉ. अ. मा. माणिकराव यांनी दिली आहे.
मुंबई येथील सह आयुक्त (औषधे) तथा नियंत्रण प्राधिकारी यांच्या निर्देशानुसार, अमरावती जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न असलेली औषध दुकाने तसेच 24 तास सुरू असणार्या औषध दुकानांशी प्रशासनाने तातडीने समन्वय साधला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधित दुकानांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर देखील आवश्यक औषध दुकाने सुरू राहतील, यादृष्टीने प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था आणि आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच खाजगी व निमसरकारी रुग्णालयांच्या प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी या बंदच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध पुरवठ्याबाबत नागरिकांना कोणतीही अडचण किंवा तातडीची गरज भासल्यास, अमरावती कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिक 0721-2665892 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा क्षलराीरुरींळ2022सारळश्र.लेा या ई-मेलवर संपर्क साधू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने औषधे उपलब्ध करून देण्यास प्रशासन पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही डॉ. माणिकराव यांनी दिली आहे.




