विकासकामांसाठी विधानसभेत आ.राजेश वानखडे यांची लक्षवेधी
सिंचन, आरोग्य, शेतकरी प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधणार

औद्योगिक प्रकल्पांसह रोजगारनिर्मितीचा मुद्दाही गाजणार
अमरावती /27 नोव्हेंबर- तिवसा विधानसभा मतदारसंघातील सिंचन, शेतकर्यांच्या समस्या, ग्रामीण आरोग्य, पाणीपुरवठा, औद्योगिक विकास, रोजगार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न आगामी हिवाळी अधिवेशनात मांडून सरकारचे लक्ष वेधण्याची तयारी आमदार राजेश वानखडे यांनी केली आहे. अमरावती, भातकुली, तिवसा आणि मोर्शी या 4 तालुक्यांतील रखडलेली विकासकामे, बनावट बियाणे विक्री, ग्रामीण रुग्णालये आणि औद्योगिक प्रकल्पांना गती देण्याच्या मागण्या ते मांडणार आहेत. कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांसाठी विशेष निधीची मागणी केली जाणार आहे. सिमेंट नाला बांध, नदी- नाल्यांचे खोली करण, तलावां मधील गाळ काढणे आणि पाझर तला वांच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित होणार आहे. माहुली जहागीर, नेरपिंगळाई, खोलापूर आणि वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढवून ग्रामीण रुग्णालये सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे. खरीप हंगाम 2026 मध्ये बुस्टर कंपनीच्या माध्यमातून झालेल्या निकृष्ट व बनावट बियाणे विक्रीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. पात्र महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्याचा प्रश्न मांडला जाणार आहे. तिवसा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विस्तारासह नांदगाव पेठ येथील भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे रखडलेले काम मार्गी लावण्याची मागणी होणार आहे. पंतप्रधान मित्र वस्त्रोद्योग उद्यानातील भूखंडवाटप, पायाभूत सुविधा आणि उद्योग सुरू होण्याबाबतही सरकारला जाब विचारला जाणार आहे. जलजीवन अभियानातील 105 गावांसह 32 गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी निधी, शिवगाव व बोरा नदी प्रकल्पातील भूसं पादनाचा मोबदला आणि विदर्भातील सिंचन प्रकल्पांचे प्रश्नही मांडले जाणार आहेत. तिवसा नगरपंचायतीची मलनिस्सारण योजना, नवीन प्रशासकीय इमारत आणि उर्ध्व वर्धा धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेलाही निधी मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही उपस्थित केला जाणार आहे.
चार तालुक्यांच्या विकासासाठी जोरदार पाठपुरावा
अमरावती, भातकुली, तिवसा आणि मोर्शी तालुक्यांतील शेतकरी, महिला, ग्रामीण नागरिक आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना अधिवेशनात प्राधान्य दिले जाणार आहे. सिंचन, पाणीपुरवठा, आरोग्य, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय मिळविण्यासाठी आमदार राजेश वानखडे प्रयत्न करणार आहेत.





