महावितरणच्या अभय योजनेमध्ये 54 हजार वीजग्राहकांचा सहभाग

‘अर्ली बर्ड’ सवलतीसाठी आता 20 दिवस शिल्लक

अमरावती/27 नोव्हेंबर- कायम स्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी वीजग्राहकांना थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘अभय योजना 2026-27’ ला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 20 दिवसांत राज्यभरातील 54 हजार ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला असून 8 कोटी 53 लाख रुपयांचा भरणा केला आहे. दरम्यान, मूळ थकबाकीमध्ये 20 टक्क्यांपर्यंत सवलत देणार्‍या ‘अर्ली बर्ड’ मुदतीसाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत आता फक्त 20 दिवस शिल्लक आहेत. लघु व उच्चदाबाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी ग्राहकांना मोठा दिलासा देणारी ही योजना येत्या 15 जानेवारी 2027 पर्यंत सुरू राहणार आहे. थकबाकीमुक्तीसाठी घसघशीत सवलतींचा समावेश असणार्‍या अभय योजनेअंतर्गत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार तसेच मागणी आकार / स्थिर आकार 100 टक्के माफ करण्यात येत आहे. यासह मागणीनुसार नवीन वीजजोडणी किंवा पुनर्जोडणी देखील तात्काळ मिळणार आहे. तसेच सर्व ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी किंवा पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. योजनेत मूळ थकबाकीची रक्कम एकाचवेळी किंवा व्याजमुक्त हप्त्यांनी भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.‘अर्ली बर्ड’ सवलतीचा लाभ घेण्यासाठी 20 दिवसांची संधी- अभय योजना सुरू झाल्यापासून दि. 15 डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणार्‍या ग्राहकांसाठी विशेष ‘अर्ली बर्ड रिबेट’ देण्यात येत आहे. या सवलतीच्या लाभासाठी आता केवळ 20 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

Back to top button