राजकमल रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त
रेल्वे स्टेशन-बेलपुरा मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद

काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचा खोळंबा
अमरावती /27 नोव्हेंबर- शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी बेलपुराकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला असून, पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागणार आहे. गुरुवारी रात्री रेल्वे स्थानक चौकातून बेलपुराकडे जाणारा रस्ता बंद करून पुलाचा काही भाग तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. या बदलामुळे शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांवर ताण वाढण्याची शक्यता असून, दुसरीकडे राजकमल चौक ते जयस्तंभ चौकादरम्यानचा रस्ता मात्र वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. पुढील टप्प्यात या मार्गावरही बांधकामासाठी बंदी लागू शकते.
शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राजकमल रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुमारे 125 कोटी रुपये खर्चातून सुरू आहे. महारेल आणि एल अँण्ड टी समूहाच्या माध्यमातून हे काम वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बांधकाम यंत्रणांनी 2027 च्या अखेरपर्यंत नवीन पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, सध्या जुना पूल तोडणे आणि नवीन बांधकाम सुरू असताना नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानक, बेलपुरा, राजापेठ आणि इर्विन चौक परिसरात ये-जा करणार्या नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. पूल बंद झाल्याने पर्यायी रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढणार असून, सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. नवीन पूल भविष्यात वाहतुकीला दिलासा देणार असला, तरी बांधकाम काळात नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था राबविण्याची गरज आहे.
पर्यायी मार्गांचा अभाव ठरणार डोकेदुखी
राजकमल रेल्वे उड्डाणपुलाचे काम शहराच्या भविष्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचे असले, तरी सध्याच्या बंद मार्गामुळे नागरिकांची गैरसोय वाढणार आहे. बेलपुरा, राजापेठ, रेल्वे स्थानक आणि इर्विन चौक परिसरातील वाहनचालकांना वळसा घालून जावे लागणार आहे. पर्यायी मार्गांवर वाहतूक नियंत्रण, सूचना फलक आणि सुरक्षेची व्यवस्था केल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो. बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन गांभीर्याने करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.