राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागांवर दावा सांगता येणार नाही

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई/14 मे-सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ घेणार्‍यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आरक्षणाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. केंद्र सरकार आणि गुजरात राज्याप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारनेही आरक्षणाचं धोरण निश्चित केलं आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही. मात्र राखीव प्रवर्गातून अर्ज आणि शुल्क भरलं असेल आणि कुठल्याही राखीव प्रवर्गाचा लाभ घेतला नसेल तर खुल्या प्रवर्गातून नियुक्ती होईल.
या आधी आरक्षणाच्या संबंधित स्पष्ट धोरण नसल्याने हा विषय अनेकवेळा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राच्या आणि गुजरातच्या धर्तीवर असा निर्णय घेतल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात सरकारी नोकर्‍यांमधील आरक्षण धोरण हे उभे आरक्षण आणि आडवे आरक्षण अशा दोन स्तरांवर लागू होते. 2024 मध्ये मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्गांतर्गत 10% आरक्षणाचा कायदा करण्यात आला असून, त्यानुसार राज्यातील एकूण उभे आरक्षण वाढले आहे. काही भरती प्रक्रियांमध्ये जिल्हानिहाय किंवा न्यायालयीन आदेशांनुसार अंमलबजावणीत बदल असू शकतात, त्यामुळे अंतिम आकडे संबंधित जाहिरात आणि शासन निर्णयानुसार तपासणे आवश्यक असते.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button