अमरावतीत सनदी लेखापाल दिन उत्साहात
रक्तदान शिबिरात अनेकांचा सहभाग

अमरावती /1 जुलै– भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या अमरावती शाखेतर्फे बुधवारी सनदी लेखापाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सनदी लेखापाल दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात जानेवारी 2026 आणि मे 2026 मध्ये उत्तीर्ण होऊन नवीन सनदी लेखापाल झालेल्या सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे विद्यार्थी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ सदस्य रत्न शर्मा आणि स्वाती पुरोहित यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच निलेश लाठिया यांची गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी, तर राजेश पटेल यांची कार्यकारी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. अमरावती शाखेचे अध्यक्ष हर्ष शर्मा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सनदी लेखापाल दिन हा केवळ व्यावसायिक उत्सव नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदार्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. नवीन सदस्यांनी आपल्या कार्यशैलीतून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला शंभराहून अधिक सनदी लेखापाल आणि विद्यार्थी उपस्थित होते. महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी आपल्या भाषणातून नवीन सदस्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वृक्षारोपण आणि रक्तदानसारख्या सेवाकार्यातून संस्थेने समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
सनदी लेखापालांचे समाजासाठी बहुमोल योगदान-व्यावसायिक ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणे हेच सनदी लेखापालांचे मुख्य उद्दिष्ट आहे. रक्तदान आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवून या तज्ज्ञांनी आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत मोलाची भर घालणार्या या मंडळींनी सामाजिक कार्याचा वसा जपून नवी प्रेरणा दिली आहे.




