विद्यापीठाच्या उभारणीमध्ये कर्मचार्यांचाही सहभाग
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे प्रतिपादन

* विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचार्यांना सन्मानपूर्वक निरोप
अमरावती /1 जुलै– अमरावती येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रगतीत आणि उभारणीत तेथील कर्मचार्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. तन-मनाने सेवा देणारे कर्मचारी मिळणे हे संस्थेचे भाग्यच असते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. विद्यापीठाच्या कर्मचारी भवनात आयोजित सेवानिवृत्ती सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यापीठाच्या विस्तारात कर्मचार्यांनी दिलेले योगदान वाखाणण्याजोगे असून, यापुढेही आपल्या अनुभवाचा लाभ संस्थेला मिळावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, उपकुलसचिव मंगेश वरखडे, विक्रांत मालवीय, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर आणि कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र घटोळ उपस्थित होते.कार्यक्रमात अजय देशमुख, भीमराव वाठोरे, अनिल चौधरी, गजानन वराडे आणि मोरेश्वर मुंजाळे या सेवानिवृत्त कर्मचार्यांचा शाल, श्रीफळ आणि गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नींचाही साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले. आभार प्रदर्शन अधीक्षक डॉ. धनंजय पाटील यांनी मानले. या सोहळ्याला विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पर्यावरण संवर्धनाचे मोठे आव्हान विद्यापीठाच्या उद्यान विभागाने यशस्वीपणे पेलले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार मिळवणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले असून, यात उद्यान विभागाचा वाटा मोठा असल्याचे डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले. सेवानिवृत्त कर्मचार्यांनी आपल्या मनोगतातून सेवेतील आठवणींना उजाळा दिला.




