माकडांचा वाढता उपद्रव; मनपाची तातडीची कारवाई

माकडांचे सुरक्षित स्थलांतर

अमरावती /21 जून: शहरातील गोसावी कॉलनी, सुतगिरणी रोड, न्यू प्रभात कॉलनी ग्राउंड व हनुमान मंदिर परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील माकडे अत्यंत आक्रमक बनल्याने रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांवर विनाकारण हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, माकडांच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 10 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन वृद्ध महिलांनाही माकडांनी ढकलून जखमी केले आहे. तसेच एका वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर माकडाने नखांनी वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
याशिवाय माकडे घरांमध्ये घुसून अन्नपदार्थ व इतर वस्तूंचे नुकसान करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या प्रकारामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत होता. या गंभीर समस्ये बाबत स्थानिक नागरि कांच्या तक्रारी नंतर गटनेता तथा सन्माननीय नगर सेवक डॉ. राजेंद्र तायडे यांनी महानगरपालिका प्रशासन, पशुवैद्यकीय विभाग यांच्यात समन्वय साधून तातडीने कारवाईसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकारामुळे या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्यात आली. त्यानंतर अमरावती महानगरपालिका माननीय आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख आणि उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय विभागामार्फत माकडांना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान पशुवैद्यकीय विभागाचे निरीक्षक पंकज कल्याणकर, आरएफओ धनदार अमोल गावणेर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या या तातडीच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातही अशा समस्यांवर तत्परतेने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button