सोहम योगाभ्यासी मंडळात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

अमरावती /21 जून: श्री कॉलनी येथील सोहम योगाभ्यासी मंडळात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश मार्डीकर स्थायी समिती सभापती, महानगरपालिका अमरावती होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती संध्याताई टिकले माजी उपमहापौर, मधुरा मिलिंद कहाळे विधी समिती उपसभापती, श्री मंगेश भाऊ मनोहरे नगरसेवक, प्रभाग क्र. 10 तसेच श्री प्रदीप हिवसे नगरसेवक, महानगरपालिका अमरावती उपस्थित होते.
यावेळी योग प्रशिक्षक दिलीप शेलोटकर यांनी योगाचे महत्त्व विशद करताना, चित्तशुद्धीसाठी योग, वाणीशुद्धीसाठी व्याकरण आणि शरीरशुद्धीसाठी वैद्यकशास्त्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात स्थायी समिती सभापती श्री अविनाश भाऊ मार्डीकर म्हणाले, योग म्हणजे केवळ शरीर वाकविणे नव्हे, तर बदलत्या परिस्थितीला, वाढत्या वयाला आणि जबाबदार्‍यांना समत्वाने स्वीकारण्याची कला आहे. आजचा योग म्हणजे उद्याच्या निरोगी भारतासाठी केलेली बचत आहे. वृद्धत्व थांबवता येत नसले तरी योगाच्या माध्यमातून त्याचा वेग निश्चितच कमी करता येतो. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांनी सादर केलेली यौगिक आसनांवर आधारित बहारदार शरीररचना व नृत्यात्मक सादरीकरण. उपस्थितांनी या सादरीकरणास उत्स्फूर्त दाद दिली. हे सादरीकरण सोहम योगाभ्यासी मंडळाची जमेची बाजू ठरले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजीवजी ठवरे, दीपक जुमडे, सुभाष भटकर, पांडुरंग सुर्वे, सुनील नवले, तुषार पाटील, प्रवीण आकोडे, ऋतुराज दशमुखे, डॉ. अनिरुद्ध शेलोटकर, सत्यजित ठोसरे, श्रीरामचंद्र लोणारे, कैलास कावना, भास्कर ठेवले, विजय शिरभाते, नरेंद्र खैरे, राजेंद्र तलवारे, प्रभाकर आसोडे आणि रवींद्र उमाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी शेरेकर यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button