वीज बचतीचा मार्ग आता घरबसल्या सुकर

स्मार्ट मीटरने ग्राहकांची मोठी बचत

विभागातील ग्राहकांना सवलतीचा दिलासा

अमरावती/21 जून- अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतील घरगुती वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्मार्ट वीज मीटरच्या वापरामुळे गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांनी तब्बल 1 कोटी 65 लाख 11 हजार रुपयांची घसघशीत बचत केली आहे. वीज वितरण प्रणालीमध्ये झालेल्या या आमूलाग्र बदलामुळे ग्राहकांना आता दिवसाच्या विशिष्ट वेळेत वीज वापरून आर्थिक लाभ मिळवणे सहज शक्य झाले आहे.
महावितरणने लागू केलेल्या नवीन वीजदरानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात वीज वापरणार्‍या ग्राहकांना आता प्रति युनिट 85 पैशांची सवलत मिळत आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत अमरावती परिमंडळातील 5 लाख 56 हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 3 लाख 28 हजार ग्राहकांना 1 कोटी 12 लाख 56 हजार रुपयांची, तर यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 28 हजार ग्राहकांना 52 लाख 54 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची नोंद अचूक होत असून मोबाईलच्या माध्यमातून ग्राहकांना तासागणिक आपल्या वापराची माहिती मिळत आहे. यामुळे वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्रणा आणि पाणी तापवण्याचे संच यांसारखी जास्त वीज लागणारी उपकरणे सवलतीच्या वेळेत वापरून ग्राहकांना आपले वीज बिल कमी करणे आता सोपे झाले आहे. हे नवीन मीटर पूर्णपणे वीज वापरानंतर देयके येणारे असून ते पोस्टपेड स्वरूपाचे आहेत. हे मीटर बसवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क ग्राहकांकडून घेतले जाणार नाही. ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता या आधुनिक आणि अचूक यंत्रणेचा स्वीकार करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. मीटरबाबत काही शंका असल्यास त्या तत्काळ निरसन करण्यात येणार असून ग्राहकांनी या डिजिटल क्रांतीमध्ये सहभागी होऊन आपला आर्थिक फायदा करून घ्यावा.

संबंधित बातम्या

Back to top button