अमोनिया वायूची गळती; सात महिला कामगारांचा मृत्यू

67 कामगार रुग्णालयात दाखल, 7 जणांची प्रकृती गंभीर

कंपनीवर गुन्हा दाखल

चैन्नई/21 जून- तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये (मत्स्य प्रक्रिया केंद्र) अमोनिया वायूची मोठी गळती झाली आहे. या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटनेत 7 महिला कामगारांचा मृत्यू झाला असून, अनेक कामगारांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार, किमान 67 कामगारांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, यातील 7 जणांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ही दुर्घटना पेरियापालयम जवळील कन्निगापैर गावात असलेल्या ’सेंट पीटर्स अँड पॉल सीफूड्स एक्स्पोर्ट्स’ कारखान्यात घडली. गॅस गळती झाल्यानंतर कारखाना परिसरात एकच खळबळ उडाली आणि बाधित कर्मचार्‍यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात हलवण्यात आले.या अपघाताचा बळी ठरलेले बहुतांश कामगार हे उत्तर भारतातील विविध राज्यांमधून आलेले स्थलांतरित मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. वायूच्या संपर्कात आल्यानंतर अनेकांना श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि उलट्या होणे असा त्रास सुरू झाला. प्राथमिक तपासानुसार,कारखान्यात बसवलेल्या एका मुख्य व्हॉल्व्हमधून हा अमोनिया गॅस लीक झाला. गळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आणि संबंधित विभागांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकारने गॅस गळतीचे कारण शोधण्यासाठी डीन डॉ. शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीला घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला असून, कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या इतर काही अधिकार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button