पुण्यात सचिन सानप यांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा

पाचही ठिकाणी महायुती जिंकेल: एकनाथ शिंदे यांचा दावा

शिक्षक मतदार संघात मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत

पुणे /16 ऑक्टोबर : उद्धवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुणे मतदारसंघात सचिन सानप यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषद निवडणूक 2026 साठी सचिन नवनाथ सानप यांना शिवसेना पक्षाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येत आहे, असे पत्र शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी दिले आहे.
विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, सचिन सानप हा मूळचा शिवसेनेचा आहे. पुणे शिक्षक मतदार संघात सचिन सानप याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तिथे आम्ही युतीत आहोत. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल. परंतु, इतर चारही ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढवत आहोत आणि काम करत आहोत. विधानपरिषद निवडणुकीत पाचही ठिकाणी महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्येच थेट सामना पाहायला मिळणार असून, युतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दुसरीकडे, भाजप आणि इतर मित्रपक्षांनी या निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button