डफरीनमधील तीन नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना शिवसेना उबाठाचे प्रवीण हरमकर यांचे निवेदन

अमरावती /24 ऑगस्ट जिल्हा महिला रुग्णालय (डफरीन) येथील एनआयसीयूमध्ये आग लागल्यानंतर तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार अधिकारी व तांत्रिक कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. निवेदनात प्रवीण हरमकर यांनी आरोप केला की, डफरीन रुग्णालयातील व्हेंटिलेटर तसेच अन्य जीवनरक्षक यंत्रसामग्रीच्या देखभाल व दुरुस्तीत झालेल्या हलगर्जीपणामुळे तीन निष्पाप बालकांचा जीव गेला. या प्रकरणात केवळ कनिष्ठ स्तरावरील कर्मचार्‍यांवर कारवाई करणे पुरेसे नसून, रुग्णालयातील व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक यंत्रसामग्रीच्या देखभाल आणि तांत्रिक तपासणीची जबाबदारी असलेल्या अभियंता तसेच संबंधित तांत्रिक अधिकार्‍यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
जबाबदार अभियंत्याची तत्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मृत नवजातांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. केवळ कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कारवाई न करता घटनेचे मूळ कारण आणि खरे जबाबदार कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. तरच भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि जनता व प्रशासनातील विश्वास कायम राहील, असे हरमकर यांनी म्हटले. दरम्यान, अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) परिसरात अतिवृष्टीमुळे सुमारे दीड फूट पाणी साचल्याचा मुद्दाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. रुग्णालयासारख्या संवेदनशील परिसरात जलभरावाची परिस्थिती गंभीर असून, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या दोन्ही मुद्द्यांवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी प्रकरण गांभीर्याने घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button