डफरीन रुग्णालयातील भीषण आगीची महापौरांकडून पाहणी

अमरावती /24 ऑगस्ट: अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 24 ऑगस्ट 2026 रोजी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि सभागृह नेते चेतन गावंडे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी महापौर तेजवानी व सभागृह नेते गावंडे यांनी रुग्णालयातील आग लागलेल्या परिसराची पाहणी करून संबंधित अधिकार्यांकडून घटनेची माहिती घेतली. आगीमुळे झालेली हानी, रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.
तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करणे, आपत्कालीन मार्ग व साधनांची नियमित तपासणी करणे आणि सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे यावेळी महापौरांनी सांगीतले. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी आणि सभागृह नेता चेतन गावंडे यांनी विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे तसेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संवाद साधून दुर्घटनेबाबत माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.




