नवनीत राणांनी केली थेट बांधावर जाऊन पाहणी
शेतशिवारात पाहणी करत मुख्यमंत्र्यांशी साधला थेट संवाद

अमरावती/29 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यात यावर्षी निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बळीराजाचे कंबरडे मोडले असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हेच गांभीर्य लक्षात घेत माजी खासदार नवनीत राणा यांनी थेट शेतकर्यांच्या बांधावर आणि शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. भातकुली, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर तसेच चांदूर बाजार तालुक्यातील विविध गावे आणि वाड्या-वस्त्यांवर जाऊन त्यांनी सोयाबीन, तूर, कापूस यांसारख्या पिकांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली.
शेतकर्यांवर आलेले हे आर्थिक संकट आणि त्यांच्या व्यथा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. शेतकरी हा आपल्या राज्याचा खरा कणा आहे, आणि संकटाच्या या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शक पद्धतीने वस्तूनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत. एकही बाधित शेतकरी या मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे कडक निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित संबंधित अधिकार्यांना दिले.अमरावती जिल्ह्यातील सर्व चौदा तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाची दिवाळी कोणत्याही शेतकर्यासाठी अंधारात किंवा आर्थिक संकटात जाणारी ठरू नये, यासाठी दिवाळीपूर्वीच सर्व बाधित शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई आणि हक्काची मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण पाहणी दौर्यात कृषी अधिकारी प्रमोद इम्मानुअल, तहसीलदार अक्षय मांडवडे, तहसीलदार पुष्पलता सोळंके, तहसीलदार कांडेकर, उपकृषी अधिकारी श्रीकांत उत्ताडे, उपकृषी अधिकारी अविनाश देशमुख, सहकृषी अधिकारी प्रमोद वाघोडे, कृषी सहायक वारकरी, मंडळ कृषी अधिकारी धिरज मारोडकर, आरती साबळे, पोलीस निरीक्षक राठोड, कृषी विभागाचे कुटेमाटे, गितांजली सरडे, महसूल विभागाचे मिरगे, माळवे यांच्यासह माजी आमदार रमेश बुंदेकोड, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, प्रकाश साबळे, सोन्याली नवले, नगराध्यक्ष रूपालीताई माळवे, जिल्हा महामंत्री सुधीर आगोडे, अतुल वाठ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तुषार खेडोडे, अणिताताई ताराचंद काळिओ, संजय शेन्द्रावे, शरद आठोले, राजेश राऊत, नीता बोचरे, संगीता उळे, नंदू वारकरी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





