महाराष्ट्र मंदिर विश्वस्तांचा अमरावतीत राज्यस्तरीय महाकुंभ
मंदिर संपत्ती जतन व्यवस्थापनावर होणार सखोल चर्चा, राज्यातील सर्व विश्वस्तांना कायदेशीर मार्गदर्शन मिळणार

अमरावती /29 सप्टेंबर– अमरावतीत होणार्या राज्यस्तरीय मंदिर विश्वस्त महासंमेलनात मंदिर संस्कृतीचे जतन, देवस्थानांच्या जमीन व मालमत्तेचे संरक्षण, पारदर्शक व्यवस्थापन, लेखापरीक्षण, मंदिर विकास आणि भाविकांच्या सहभागासह विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. 3 ऑक्टोबरला होणार्या या संमेलनात राज्यभरातील विश्वस्त, अधिकारी, कायदेतज्ज्ञ आणि पदाधिकारी सहभागी होणार असून मंदिर संस्थांच्या अडचणींवर मार्गदर्शन आणि राज्यभर समन्वयासाठी कृती आराखड्यावरही विचारमंथन होणार आहे.
महाराष्ट्र देवस्थान समिती आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त देखरेखीखाली हे महासंमेलन 3 ऑक्टोबरला सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जनार्दन पेठेतील श्री एकवीरा देवी मंगल कार्यालयात होणार आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्यासह धर्मादाय विभागातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कायदेतज्ज्ञ आणि अधिवक्ते या वेळी उपस्थित राहणार आहेत. मंदिर विश्वस्तांना जमीन व मालमत्ता जपताना येणार्या अडचणी, संस्थेचे दैनंदिन व्यवस्थापन, हिशेब तपासणी, आवश्यक कागदपत्रे, मंदिर विकास, धार्मिक उपक्रम आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी समन्वय अशा विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मंदिर विश्वस्तांच्या विविध कायदेशीर अडचणी, मंदिर विकासातील अडथळे आणि भाविकांच्या सहभागातून राबवता येणार्या उपक्रमांवरही चर्चा होईल. राज्यातील मंदिरांमध्ये परस्पर समन्वय वाढविण्यासाठी आवश्यक कृती आराखड्यावर विचार केला जाणार आहे. महासंमेलनाच्या तयारीसाठी जिल्हा आणि तहसील पातळीवर 14 पेक्षा जास्त बैठका घेण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमे आणि वृत्तमाध्यमांतून जनजागृती सुरू असून अमरावतीसह विविध तहसील भागांत फलक लावण्यात आले आहेत. मंदिरांचे अध्यक्ष, विश्वस्त, सचिव, पदाधिकारी आणि सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक कैलासकुमार पनपालिया यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला कैलासकुमार पनपालिया, आशीष मारुडकर, निलेश टवाळे, ओमप्रकाश परतानी, कैलास गिरोलकर, धनराज वेतनकर, श्रीकृष्ण माहोरे, रोहन डोमणे, मोहन इंगळे, विजय करडे आणि रवींद्र भोयर यावेळी उपस्थित होते.





