विकासाचे उद्दिष्ट विषमता कमी करणे असावे
सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

नागपूर/29 सप्टेंबर ; समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक व्यक्तीचे कल्याण साधणे हे विकासाचे उद्दिष्ट असले पाहिजे. विकासाच्या सर्वोच्च व निम्न स्तरांमधील तफावत शक्य तितकी कमी असावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भागवत बोलत होते.
भागवत म्हणाले, अंत्योदय या संकल्पनेचा अर्थ समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीला शक्य तितके सुखी करणे हा आहे, यालाच अंत्योदय असे म्हणतात. विकासाचा अर्थ सर्वांनी एकाच पातळीवर पोहोचणे असा होऊ शकत नाही, परंतु त्यातील विषमता कमी केली पाहिजे.
काही लोक म्हणू शकतात की, इतक्या मोठ्या समाजात प्रत्येकजण विकासाच्या एकाच पातळीवर राहू शकत नाही. ते ठीक आहे. परंतु विकासाच्या निम्न आणि सर्वोच्च स्तरांमधील तफावत शक्य तितकी कमी असावी. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी विकासाची जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण ही व्याख्या स्वीकारली नव्हती.
त्यांचे म्हणणे होते की, सर्वांचेच कल्याण झाले पाहिजे. निर्णय घेताना समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरील व्यक्तीचा विचार करण्याच्या महात्मा गांधींच्या तत्त्वाचाही त्यांनी उल्लेख केला. आयुष्यात जेव्हा कधी तुम्ही काही कराल, तेव्हा समाजाच्या अगदी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीचा विचार करा.स्वतःला विचारा की, मी जे करत आहे त्याचा त्या व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल का? जर तसे होणार असेल, तरच ते काम करा. जर तसे होणार नसेल, तर ते करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.विकासातून अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजांची पूर्तता होण्यासोबतच शिक्षण आणि आरोग्यसेवांची उपलब्धताही सुनिश्चित झाली पाहिजे. तसेच, लोकांनी सन्मानाने जगणे आणि इतरांचे आदरातिथ्य करणे या क्षमतांवरही त्यांनी भाष्य केले. निसर्गाचा बळी देऊन विकास साधला जाऊ नये; विकास आणि पर्यावरण या दोघांचेही रक्षण झाले पाहिजे. जमिनीचे आरोग्य जपून शेतकर्यांचे कल्याणसाधण्याच्या गरजेवर भागवत यांनी भर दिला.तसेच, त्यांनी मिश्र शेती, सेंद्रिय शेती, पशुपालन आणि बियाणे, खते व कीटकनाशके यांबाबत अधिक स्वावलंबन या गोष्टींचा पुरस्कार केला. शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकणार नाहीत आणि अधिक स्वावलंबी होतील, हे सुनिश्चित करणे हेच उद्दिष्ट असले पाहिजे. समाजालाच विकासाची प्रक्रिया पुढे न्यावी लागेल; ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, असे ते म्हणाले.





