दीड हजार गणेश मंडळांसाठी 2 हजार जवानांची सुरक्षा
पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांची पत्रकार परिषदेतून माहिती

जिल्ह्यातून 7 गुन्हेगार हद्दपार, 498 जणांवर प्रतिबंधात्मक प्रक्रिया
अमरावती /11 सप्टेंबर– आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील 1 हजार 509 गणेश मंडळांच्या सुरक्षेसाठी सुमारे 2 हजार पोलिस अधिकारी कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्यांचीही मदत घेण्यात आली आहे. गणेश स्थापना ते विसर्जनापर्यंत महत्त्वाच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून मिरवणूक आणि विसर्जन मार्गांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी अडथळे उभारून वाहनतळ आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था केली जाणार आहे. उत्सवापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्यात आला असून 3 हजार 410 जणांवर विविध कायद्यांनुसार कारवाई करण्यात आली आहे. 948 जणांवर प्रतिबंधात्मक आदेशाची प्रक्रियासुरू असून 7 गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. एका गुन्हेगारी टोळीला जिल्ह्याबाहेर करण्यात आले असून दोन जणांवर स्थानबद्धतेचे आदेश मिळाले आहेत. जिल्ह्यातील 3 हजार 500 ठिकाणी 21 हजार 500 दूरचित्रण कॅमेरे कार्यरत असून आणखी 1 हजार कॅमेरे बसविले जात आहेत. मानवरहित आकाशी कॅमेर्यांतूनही पाहणी केली जाणार आहे. गणेश मंडळे आणि विविध समित्यांसोबत 225 बैठका घेण्यात आल्या आहेत. ध्वनिप्रदूषणाचे नियम तोडणार्यांवर कारवाई केली जाणार असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निकेतन कदम यांनी केले.
21 हजार 500 कॅमेर्यांची नजर-गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील 3 हजार 500 ठिकाणी कार्यरत असलेल्या 21 हजार 500 दूरचित्रण कॅमेर्यांतून हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. सुरक्षेत आणखी वाढ करण्यासाठी 1 हजार अतिरिक्त कॅमेरे बसविले जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी मानवरहित आकाशी कॅमेर्यांतूनही पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांना हालचालींची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.





