त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद

मंत्री गिरीश महाजन यांच्या मंदिर प्रशासनाला सूचना

नाशिक/8 ऑक्टोबर : 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (ढीळालरज्ञशीहुरी ढशाश्रिश) मंदिरातून भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विकासकामे आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील दोन महिने भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
संभाव्य नियोजनानुसार येत्या 15 किंवा 16 ऑक्टोबरपासून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात येत आहे.मंदिर जरी भाविकांच्यादर्शनासाठी बंद राहणार असले, तरी मंदिरातील पारंपरिक आणि धार्मिक परंपरा खंडित होणार नाहीत. श्री त्र्यंबकेश्वराची दररोज होणारी नित्यपूजा, त्रिकाल पूजा आणि धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहतील.
त्र्यंबकेश्वर मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. कुंभमेळ्याच्या कामांमुळे अपघात किंवा चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवू नये म्हणून गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थान ट्रस्टकडून मंदिर बंद करण्याबाबतच्या तारखांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.

Back to top button