श्री परमपूज्य योगीराज बाबा यांचा समाधी सोहळा
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले

चांदस वाठोडा/28 ऑक्टोबर – येथून जवळच असलेल्या श्री योगराज श्रीजी आश्रम, हनुमान पेठ मुसळखेडा हे संपूर्ण विदर्भासह मध्यप्रदेशात प्रसिद्ध असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणचे परमपूज्य श्री सद्गुरु योगीराज बाबा यांचे कार्तिक शुक्ल 6, दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारी सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी अनंतात विलीन झाले. श्री परमपूज्य सद्गुरु योगीराज बाबा यांच्या दर्शन यात्रेचा कार्यक्रम 28 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता श्रीजी परमपूज्य योगीराजबाबा आश्रम येथून सुरू झाला. श्री क्षेत्र मुसळखेडा येथील यशवंतबाबा देवस्थानातून ही यात्रा वाठोडा येथे पोहोचली. संपूर्ण वाठोडा, चांदस, हनुमान पेठ, मुसळखेडा आणि परिसरातील भाविक भक्त सकाळपासूनच दर्शनासाठी रांगेत उभे होते.
श्री योगीराज बाबांच्या स्नान, आरती सोहळा, पूजा-अर्चना आणि आरतीनंतर डीजे, दिंड्या, महिला भजनी मंडळ तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. ‘श्री सद्गुरु योगीराज बाबा की जय हो’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हनुमान पेठ, मुसळखेडा आणि चांदस-वाठोडा गावांत सजावट, सळा-सारवण, रांगोळ्या, पुष्पवर्षाव आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. दर्शन यात्रा संपूर्ण गावातून पार पडून श्रीजी योगीराज आश्रम येथे पोहोचली.
तेथे परमपूज्य श्री सद्गुरु योगीराज बाबा यांच्या समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंतांच्या उपस्थितीत आणि आचार्य मंडळाच्या विधिवत पूजनानुसार समाधी सोहळा संपन्न झाला. भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने समाधीचे दर्शन घेतले. या प्रसंगी श्री सद्गुरु श्री योगीराज महाराज बहुउद्देशीय संस्था, हनुमान पेठ मुसळखेडा आणि श्री सद्गुरु योगीराज बहुउद्देशीय महिला विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांसह भाविक भक्तांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने झाली.




