एकाही शेतकर्याचे नाव यादीतून सुटणार नाही
कर्जमाफीची योजना शंभर टक्के पूर्ण करणार, पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही

अमरावती/2 नोव्हेंबर : राज्यातील एकाही पात्र शेतकर्याचे नाव कर्जमाफीच्या यादीतून सुटणार नाही, सर्व प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीच्या निर्णयाची 100 टक्के अंमलबजावणी सरकार करेल, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ना. बावनकुळे हे अमरावतीच्या दौर्यावर असताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी, ओबीसी आरक्षण, खाजगी फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली आणि बिश्नोई गँगच्या धमकीसह विविध राजकीय मुद्द्यांवर शासनाची भूमिका स्पष्ट केली.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात सुमारे 10 ते 15 हजार शेतकरी कुटुंबांचे ’केवायसी’ अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी मृत आई-वडिलांच्या नावे बँक खाती असून, ती मुलांच्या नावावर हस्तांतरित करण्याच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे याला वेळ लागत आहे. मात्र, कुणालाही योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उच्चस्तरीय बैठकीतील निर्णयांवर मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी खाजगी बँका आणि पतसंस्थांना कडक इशारा दिला आहे. ‘दुष्काळाच्या या 8 महिन्यांच्या काळात पतसंस्था, खाजगी बँका किंवा फायनान्स कंपन्यांनी शेतकर्यांकडे वसुलीचा तगादा लावू नये आणि त्यांना वेठीस धरू नये. तुमचे पैसे नंतर मिळतील, पण शेतकर्याला आत्महत्येस प्रवृत्त करेल असे पाऊल उचलू नका,’ अशा कडक सूचना त्यांनी दिल्या. जर या काळात कोणी सक्तीची वसुली करत असेल, तर शासन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करेल, असा सज्जड दम त्यांनी भरला.
रांजणगाव येथील कंपनीवर तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईला मिळालेल्या स्थगितीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, सरकार कुठल्याही दबावाखाली कारवाईला स्थगिती देत नाही. अनेकदा कायदेशीर व तांत्रिक बाबी राहून गेल्यामुळे स्थगिती मिळते. तुकाराम मुंढे यांच्या तपासणीत काही त्रुटी राहिल्या असतील, म्हणून ती प्रक्रिया थांबली असावी. मुंढेंसारख्या अधिकार्याला कोणी थांबवू शकत नाही आणि त्यांच्या कारवाईत कोणी ढवळाढवळ करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथील बिश्नोई गँगच्या धमकी प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या धमकी सत्रामागे जे कोणी असतील, त्यांच्यावर शासन कडक कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.





