सातेगावच्या दिशाची मुंबई इंडियन्समध्ये दिमाखदार एन्ट्री
अंजनगाव तालुक्याचा झेंडा देशपातळीवर उंचावला

अंजनगाव सुर्जी/2 नोव्हेंबर – अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातगाव येथील दिशा दीपक कासट हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर क्रिकेटविश्वात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आगामी महिला प्रीमियर लीगच्या खेळाडूंच्या लिलावात मुंबई इंडियन्ससारख्या नामांकित संघाने तिची मूळ किमतीत निवड केली आहे. तिच्या या यशामुळे सातगावसह संपूर्ण अंजनगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिशाचा क्रिकेटप्रवास संघर्ष आणि मेहनतीने भरलेला आहे. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही तिने परिस्थितीसमोर हार न मानता क्रिकेटची आवड जपली. शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून कठोर सराव, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यापूर्वी दिशाने महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विदर्भाकडून टी-20 क्रिकेट खेळताना तिने फलंदाजीची छाप पाडली. नुकत्याच झालेल्या गटसाखळी सामन्यात पंजाबविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाल्याने तिच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे. ग्रामीण भागातील मुलीही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, हे दिशाने सिद्ध केले आहे. तिच्या निवडीमुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी स्पर्धेत ती दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. सातगावची कन्या दिशा कासट हिचे यश अंजनगाव तालुक्यासह संपूर्ण विदर्भासाठी अभिमानास्पद ठरले आहे.





