न्यायालयीन सील तोडून जप्त मालमत्तेत प्रवेश

पाच कोटींचे कर्ज थकल्याने मालमत्ता जप्त

चार जणांविरुद्ध बडनेरा पोलिसांत गुन्हा दाखल

अमरावती/2 नोव्हेंबर – न्यायालयाच्या आदेशाने सील केलेल्या आणि कर्जवसुलीसाठी जप्त केलेल्या जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्राचे कुलूप व सील तोडून परिसरात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा गंभीर प्रकार बडनेरा येथे उघडकीस आला आहे. सुमारे 5 कोटी रुपयांचे कर्ज थकवल्यामुळे श्रीराम फायनान्सने तारण ठेवलेल्या मालमत्तेवर कारवाई केली होती.
मात्र, न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून जप्त मालमत्तेत प्रवेश केल्याच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी डॉ. अनिल हरवानी, डॉ. अंकित हरवानी, संकल्प हरवानी आणि एका महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सूरज चौधरी (46, रा. कॅम्प) यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते अमरावती येथील श्रीराम फायनान्समध्ये अधिकृत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल हरवानी, डॉ. अंकित हरवानी आणि एका महिला डॉक्टरने त्यांच्या नेत्रज्योत आय हॉस्पिटलच्या नावाने श्रीराम फायनान्सकडून जवळपास 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न झाल्याने वित्तसंस्थेने तारण मालमत्तेवर वसुलीची कारवाई सुरू केली. या कारवाईअंतर्गत मौजे बडनेरा येथील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्र 6 ऑक्टोबर रोजी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सील करण्यात आले होते. त्यानंतर ही मालमत्ता श्रीराम फायनान्सच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र, सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप आणि न्यायालयीन सील तोडून संबंधितांनी परिसरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच सूरज चौधरी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास बडनेरा पोलीस करीत आहेत.
न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन भोवले-न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेल्या मालमत्तेचा ताबा श्रीराम फायनान्सकडे देण्यात आला होता. 6 ऑक्टोबर रोजी जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्र सील करण्यात आले. मात्र, त्यानंतर कुलूप आणि सील तोडून परिसरात प्रवेश केल्याची तक्रार करण्यात आली. पाच कोटींच्या थकीत कर्जातून सुरू झालेल्या या प्रकरणाला आता न्यायालयीन आदेशाच्या उल्लंघनाचे स्वरूप आले असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Back to top button