अप्पर वर्धा धरणात 42.68 टक्के पाणीसाठा

उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकेत, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

अमरावती /2 नोव्हेंबर- अमरावती शहराची तहान भागविणार्‍या अप्पर वर्धा धरणातील उपयुक्त पाणीसाठा 42.68 टक्क्यांवर आल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. धरणात पाण्याची आवक पूर्णपणे थांबली असून बाष्पीभवनामुळे दररोज पाणीसाठा कमी होत आहे. त्यातच सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. धरणाचे सर्व 13 दरवाजे बंद असले तरी उर्वरित पाणीसाठा शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी किती काळ पुरणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
धरण प्रशासनाच्या 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या आकडेवारीनुसार, धरणाची पाणीपातळी 338.13 मीटर असून एकूण पाणीसाठा 354.93 दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 240.72 दशलक्ष घनमीटर शिल्लक आहे. सध्या धरणात पाण्याची आवक बंद असून बाष्पीभवनामुळे दररोज 0.26 दशलक्ष घनमीटर पाणी कमी होत आहे. उजव्या मुख्य कालव्यातून 20 घनमीटर प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडले जात आहे. आतापर्यंत या कालव्यातून 58.0752 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग झाला आहे. डाव्या मुख्य कालव्यातून सध्या पाणी सोडणे बंद आहे. यंदा धरण क्षेत्रात 555 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्यानंतर पाण्याची आवक थांबल्याने उपलब्ध साठ्याचा जपून वापर करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे, खालच्या वर्धा धरणातील पाणीसाठ्याची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. या धरणात 70.21 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून 2 नोव्हेंबर रोजी सकाळी पाणीपातळी 282.71 मीटर नोंदविण्यात आली. धरणाचा एकूण पाणीसाठा 188.73 दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त साठा 152.26 दशलक्ष घनमीटर आहे. सध्या पाण्याची आवक आणि विसर्ग बंद आहे. बाष्पीभवनामुळे दररोज 0.095 दशलक्ष घनमीटर पाणी कमी होत आहे. यंदा या धरण क्षेत्रात 754 मिमी पावसाची नोंद झाली असून 46.96 चौरस किलोमीटर क्षेत्र पाण्याखाली आहे. एकीकडे खालच्या वर्धा धरणात समाधानकारक साठा असताना अप्पर वर्धा धरणातील घटती पाणीपातळी अमरावतीकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्याचा विचार करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत आतापासूनच काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.उपलब्ध पाण्याचे नियोजन महत्त्वाचे-अप्पर वर्धा धरणात 42.68 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून दररोज 0.26 दशलक्ष घनमीटर पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. उजव्या कालव्यातून आतापर्यंत 58.0752 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. दुसरीकडे खालच्या वर्धा धरणात 70.21 टक्के साठा उपलब्ध आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी अमरावती शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि उपलब्ध साठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक ठरणार आहे.

Back to top button