घरकाम करणार्या तरुणीने उडविले 11 तोळे सोन्याचे दागिने
राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती/2 नोव्हेंबर – घरात काम करणार्या 18 वर्षीय तरुणीने मालकिणीचा विश्वास संपादन करून कपाटातील तब्बल 107 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत 8 लाख 29 हजार रुपये असून, रामासाहूर येथे नामकरणाच्या कार्यक्रमासाठी जाण्याची तयारी सुरू असताना हा प्रकार उघड झाला. दागिने गायब असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी घरभर शोध घेतला. मात्र, काहीच माहिती मिळाली नाही. अखेर घरकाम करणार्या तरुणीवर संशय व्यक्त करून तिची चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर रस्त्यावरील गजानन टॉवर्स येथे घडली. या इमारतीतील सदनिका क्रमांक 402 मध्ये देवळे विजयकुमार मानसाता (38) हे कुटुंबासह राहतात. रविवार, 1 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मेव्हण्याच्या मुलाचा नामकरण सोहळा रामासाहूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जाण्यासाठी कुटुंबीयांची तयारी सुरू होती. त्याचवेळी देवळे मानसाता यांच्या पत्नीने कपाट उघडून पाहिले असता त्यामध्ये ठेवलेले 107 ग्रॅम सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले.कुटुंबीयांनी संपूर्ण घरात दागिन्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळाले नाहीत. त्यामुळे घरात काम करणार्या 18 वर्षीय तरुणीवर संशय व्यक्त करण्यात आला. तिला चौकशीसाठी घरी बोलावून विचारणा केली असता तिने दागिने चोरल्याची कबुली दिली. संबंधित तरुणी सुनीलनगर परिसरात राहत असल्याची माहिती आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 (अ) आणि 306 अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.





