विद्यापीठाला द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार
महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेतर्फे ऊर्जा संवर्धनासाठी

महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थाच्यावतीने कुलगुरू यांना पुरस्कार प्रदान
अमरावती /27 सप्टेंबर: पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत अमरावती येथील संत गाडगे बाबा विद्यापीठाने राज्य पातळीवर मोठा मान मिळवला आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेतर्फे (मेडा) विद्यापीठाला सोळावा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
विद्यापीठ परिसरात ऊर्जा बचतीसाठी अनेक प्रभावी आणि दूरगामी उपाय राबवले जात आहेत. कॅम्पसमध्ये 576 किलोवॉट क्षमतेचा मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात आला असून, याद्वारे संपूर्ण परिसराला स्वच्छ व हरित ऊर्जेचा पुरवठा होतो. विद्यापीठाच्या एकूण वीजेच्या गरजेपैकी तब्बल पंचावन्न टक्के वीज केवळ या सौर प्रकल्पातूनच पूर्ण होते. तसेच विजेची बचत करण्यासाठी पारंपरिक उपकरणांचे जागी ऊर्जा बचत करणार्या स्टार लेबल उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर रूपांतर करण्यात आले आहे.परिसरातील सर्व स्ट्रीटलाईट्सपैकी नव्वद टक्के दिवे आता एलईडी लाईट्समध्ये बदलण्यात आले आहेत. कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी राबवलेल्या या उपायांमुळे दरवर्षी सुमारे सहाशे टन कार्बन उत्सर्जन यशस्वीरीत्या नियंत्रित केले जात आहे. केवळ ऊर्जाच नव्हे, तर पाणी आणि वृक्ष संवर्धनातही विद्यापीठाने आदर्श पाऊल उचलले आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी दोन मोठे जलाशय आणि सहा शेततळी तयार करण्यात आली आहेत. वीसपेक्षा जास्त मोठ्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवून पाण्याचा प्रत्येक थेंब जतन केला जात आहे. वृक्ष संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेत विद्यापीठ परिसरात अडीच लाखांहून अधिक झाडे लावली असून ती जोपासण्यात आली आहेत. झाडांची गळलेली पाने आणि जैविक कचर्यापासून खत तयार करण्यासाठी खास कंपोस्ट खड्डे देखील तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे महाव्यवस्थापक अभिजीत ढिगे यांच्या हस्ते विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाटे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद सोहळ्यास प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी पुष्कर देशपांडे, कार्यकारी अभियंता शशिकांत राघोडे, उपअभियंता राजेश एडबोले, उपकुलसचिव डॉ. दादासाहेब चव्हाणे, कनिष्ठ अभियंता आकाश सोळंके यांच्यासह अभियांत्रिकी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





