पावसाअभावी विदर्भातील 56 तहसील दुष्काळाच्या छायेत

शेतकर्‍यांना मदतीचा मार्ग आता झाला मोकळा

अमरावती जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्याचा समावेश

अमरावती /27 सप्टेंबर – अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील सर्व 56 तहसीलांचा पावसाअभावी निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे दुष्काळी मदतीच्या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप हंगाम 2026 साठी राज्यातील 265 तहसीलमध्ये लागू केलेल्या ‘ट्रिगर-1’च्या यादीत अमरावती जिल्ह्यातील सर्व 14 तहसील घेतले आहेत. त्यामुळे पिकांच्या प्रत्यक्ष नुकसानीची नोंद, पंचनामे आणि पात्रतेनुसार मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम विदर्भ दौर्‍यादरम्यान केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करत खरीप हंगाम 2026 साठी राज्यातील 265 तहसीलमध्ये ‘ट्रिगर-1’ लागू करण्यात आला आहे. अमरावती महसूल विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या पाच जिल्ह्यांतील सर्व 56 तहसीलांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरूड, मोर्शी, चांदूर बाजार आणि दर्यापूर या सर्व 14 तहसीलांचा यादीत समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 16, बुलडाणा जिल्ह्यातील 13, अकोला जिल्ह्यातील 7 आणि वाशिम जिल्ह्यातील 6 तहसीलांचाही यात समावेश झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील एकही तहसील या प्रक्रियेबाहेर ठेवण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे मैदानी भागासोबत धारणी आणि चिखलदरा या मेळघाटातील डोंगराळ व आदिवासी भागांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास संपूर्ण कृषी क्षेत्र या प्रक्रियेच्या कक्षेत आले आहे. आता प्रत्यक्ष शेतातील पीक नुकसानीची नोंद घेऊन पंचनामे करणे, पात्र शेतकर्‍यांची निश्चिती करणे आणि शासनाच्या नियमानुसार मदत देणे ही पुढील प्रक्रिया राहणार आहे. पंचनामे वेळेत आणि अचूक होणे शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाअभावी खरीप पिकांना फटका बसलेल्या शेतकर्‍यांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.

Back to top button