अकोला मार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग
कुरुम गावाजवळ धुराचे लोट अन् प्रचंड पळापळ

महामार्गावर वाहतूक ठप्प; प्रवाशांमध्ये मोठी घबराट
अमरावती/15 सप्टेंबर – बडनेरा ते अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कुरुम गावाजवळ धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि परिसरात काळ्याकुट्ट धुराचे प्रचंड लोट पसरले. या आगीमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना कुरुम फाट्याजवळ चालत्या ट्रकमधून अचानक धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली. काही क्षणांतच इंजिनकडून पसरलेल्या आगीने संपूर्ण वाहनाला विळखा घातला. भर रस्त्यात आगीचे उंच भडके उडत असल्याने परिसरातील नागरिकांची आणि वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की जवळ जाणेही कठीण झाले होते. आगीचे वृत्त मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर पाण्याच्या जोरदार फवार्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी आगीत ट्रकचे अतोनात नुकसान झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी महामार्गावरील खोळंबलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. महामार्गावर घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात बराच वेळ भीतीचे सावट पसरले होते.





