घराला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू

बेळगाव/15 सप्टेंबर – देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण असतानाच गणेश चतुर्थीच्या रात्री बेळगावमध्ये काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. चव्हाट गल्ली परिसरातील एका दुकानाला आणि घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दमोने यांच्या घरातून अचानक आगीच्या तीव्र ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. पाहता पाहता आगीने संपूर्ण घराला वेढा घातला. आग इतक्या वेगाने पसरली की, घरातील रहिवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत गजानन दमोने (65), शारदा दमोने (45), भारती दमोने (50) आणि रोशन दमोने (21) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Back to top button