बिबटया आला रे आला, वडाळीत पुन्हा दहशत

सीसीटीव्हीमध्ये बिबट्याच्या हालचाली कैद

रात्रीच्या वेळी नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अमरावती /15 सप्टेंबर – वडाळी परिसरातील बागडे लेआउटमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या घरासमोर फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल मसाम यांच्या घरासमोरील निगराणी चित्रफितीत बिबट्याच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. 14 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 27 मिनिटांनी बिबट्या घरासमोरून जाताना दिसून आला. चित्रफित परिसरात पसरल्यानंतर नागरिकांची धास्ती वाढली आहे.
वडाळी परिसरालगत पोहरा जंगल असल्याने वन्यप्राण्यांचा वावर या भागात नेहमीच असतो. मात्र बिबट्या थेट वस्तीत आणि घरांच्या आसपास फिरताना दिसत असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने परिसराची पाहणी सुरू केली असून हालचाल टिपणारे कॅमेरे लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वडाळी ते छत्री तलाव मार्गावरील वळणमार्ग परिसरात यापूर्वीही अनेकदा बिबट्या दिसल्याचे नागरिक सांगतात. मागील महिन्यात राजूरा परिसरात दुचाकीस्वारावर बिबट्याने झडपघातली होती. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच चिंता वाढली आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकटे फिरणे टाळावे, अशी सूचना केली आहे. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग न करता सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी योग्य ठिकाणी पिंजरा लावावा आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

Back to top button