उत्तरप्रदेशमध्ये 403 जागांपैकी काँग्रेसला केवळ 26 जागांची ऑफर

सपाकडून बोळवण झाल्यामुळे आघाडीत मतभेद?

लखनउ/25 नोव्हेंबर  : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्र ेस आणि समाजवादी पक्षातील जागावाटपाची चर्चा पहिल्याच टप्प्यात वादळी ठरली आहे. या बैठकीनंतर समाजवादी पक्षाने मंगळवारी रात्री आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामधील दोन जागांवर काँग्र ेसने दावा केला होता आणि त्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारणपूर जिल्ह्यातील दोन जागांवर उमेदवार दिले आहेत आणि याच जागांवर काँग्र ेसचा दावा होता. काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यालाच त्यांनी रिंगणात उतरवले आहे. काँग्र ेसचा 131 जागांचा प्रस्ताव असूनही समाजवादी पक्षाने केवळ 26 जागा देण्याचे ठरवल्याने जागावाटपाला वादाचे वळण लागले. 26 मतदारसंघांमध्ये गांधी घराण्याचा गड मानल्या जाणार्‍या अमेठी-रायबरेली मतदारसंघांंत फक्त एक एक जागा देण्याची तयारी दर्शवल्याने काँग्र ेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जागावाटपाबाबत गंभीर नसल्याचा आणि चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना पुरवल्याचा आरोपही काँग्र ेसने समाजवादी पक्षावर केला. बैठकीत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 80 पैकी 17 जागा लढविणार्‍या काँग्र ेसला 403 विधानसभा जागांपैकी केवळ 26 जागांची ऑफर कशी दिली जाऊ शकते, असा संतप्त सवाल त्यांनी केला आणि याबाबत आम्ही लवकरच औपचारिक निवेदन देऊ, असेही त्यांनी नमूद केले. या वादानंतर काही तासांनी अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहीत चर्चेची दारे खुली असल्याचे म्हटले. पण, जागावाटपात जिंकण्याची क्षमता हाच मुख्य निकष असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. जिंकण्याची क्षमता या आधारावर समाजवादी पक्ष काँग्र ेसला अशाही जागा सुचवू शकतो, ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल, असे अखिलेश यांनी नमूद केले. त्यासाठी जनतेच्या अपेक्षा आणि वास्तव यांचा विचार करून दोन्ही पक्षांनी गंभीर चर्चा करावी, तरच आपली युती बहुतांश मतदारसंघांत जिंकू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

Back to top button