भ्रष्ट पक्षांशी युती केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता
शिंदेसेनेचा सुप्रीम कोर्टात दावा

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुनावणी
नवी दिल्ली/15 सप्टेंबर : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील अधिकाराच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. भ्रष्ट पक्षांशी युती केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता, असा दावा शिंदेंच्या वतीने करण्यात आला.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे. शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. शिवसेना पक्षाच्या घटनेत 1999 ते 2018 या कालावधीत करण्यात आलेल्या बदलांची माहिती कौल यांनी न्यायालयासमोर मांडली.
पक्षावरील दाव्याचा निर्णय घेताना तीन बाबी महत्त्वाच्या ठरतात, असे कौल यांनी सांगितले. पक्षाची घटना, पक्षाचे संघटनात्मक स्वरूप आणि विधिमंडळातील संख्या या तीन बाबी विचारात घेतल्या जातात, असा युक्तिवाद त्यांनी केला.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाला व्यापक आणि पूर्ण अधिकार आहेत, असा दावा कौल यांनी केला. निवडणूक आयोगाने या प्रकरणात काही अभूतपूर्व केले असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.लोकनियुक्त आणि लोकशाही व्यवस्था असावी, याची घटनात्मक भूमिका मांडण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचे कौल यांनी सांगितले. यासाठी त्यांनी यापूर्वीच्या काही न्यायालयीन प्रकरणांचे दाखलेही दिले.
निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी पक्षांतर्गत काही ठराव मंजूर करण्यात आले होते, असे कौल यांनी सांगितले. पक्षात दोन गट निर्माण होण्यामागे केवळ विधिमंडळातील फूट कारणीभूत नव्हती, असा दावा त्यांनी केला.
निवडणुकीपूर्वी वैचारिकदृष्ट्या जुळणार्या पक्षासोबत असलेली युती तोडण्यात आली आणि निवडणुकीनंतर सत्ता मिळवण्यासाठी पक्षाच्या संस्कृती व मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात असलेल्या पक्षासोबत युती करण्यात आली, असा युक्तिवाद कौल यांनी केला. यासाठी त्यांनी राणा प्रकरणाचा दाखला दिला. हा दाखला कपिल सिब्बल यांनीही दिल्याचे त्यांनी नमूद केले.





