देऊरवाडा परिसरात वाघ दिसल्याची खोटी अफवा

ए-आयवर बनवलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल

खोटी माहिती पसरवणार्‍या तरुणाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

अमरावती/11 सप्टेंबर – चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा परिसरात वाघ दिसल्याची खोटी अफवा समाजमाध्यमांवर पसरल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. अनेक शेतकरी आणि शेतमजुरांनी भीतीपोटी शेतीची कामे सोडून गावातच थांबणे पसंत केले. वनविभागाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वाघ दिसल्याची माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत देऊरवाडा येथील शेख समीर शेख आझाद या 24 वर्षीय तरुणाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वाघाचे बनावट छायाचित्र तयार करून ते समाजमाध्यमांवर पसरवल्याचे उघड झाले.
वनरक्षक प्रवीण श्यामराव तलखंडकर यांच्या तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात शेख समीर शेख आझाद याच्याविरुद्ध भारतीयन्याय संहितेच्या कलम 353 (1) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून वाघ फिरत असल्याचे सांगणारी ध्वनिचित्रफीत आणि संदेश वेगाने पसरत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडाली होती. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, देऊरवाड्याचे सरपंच आणि पोलिसांनी परिसरात पाहणी केली. वाघाच्या हालचालींचे कोणतेही चिन्ह आढळले नाही. चौकशीत शेख समीरने सुरुवातीला छायाचित्र खरे असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्ष शेतात पाहणी केल्यानंतर त्याने बनावट छायाचित्र तयार करून ते पसरवल्याची कबुली दिली. या प्रकारामुळे वनविभाग आणि पोलिसांची दिवसभर धावपळ झाली. नागरिकांनी समाजमाध्यमांवरील कोणतीही माहिती तपासल्याशिवाय विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

Back to top button