डफरीनची फॉरेन्सिक लॅब पथकाकडून तपासणी
अग्निकांडाच्या तपासाला वेग, नवजात कक्षाची सखोल पाहण

आगीचे नेमके कारण शोधण्याचा पुरेपुर प्रयत्न
अमरावती/11 सप्टेंबर– येथील डफरीन जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात झालेल्या भीषण अग्निकांडाच्या तपासाला आता वेग आला आहे. राज्य न्यायवैज्ञानिक विज्ञान प्रयोगशाळेच्या विशेष पथकाने गुरुवारी अचानक रुग्णालयात दाखल होत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. आगीत नुकसान झालेली उपकरणे, विद्युत व्यवस्था, तारांची जोडणी, वैद्यकीय यंत्रसामग्री आणि आग लागण्याची शक्यता असलेल्याभागांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. न्यायवैज्ञानिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून आवश्यक नमुने आणि तांत्रिक पुरावे जमा केल्याची माहिती आहे. आग विद्युत बिघाडामुळे लागली की एखाद्या उपकरणातील तांत्रिक दोषामुळे किंवा अन्य कारणामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे. नवजात कक्षातील प्राणवायू पुरवठा यंत्रणा, सुरक्षितता व्यवस्था आणि आग प्रतिबंधक साधनांची स्थितीही तपासण्यात आली. विशेष म्हणजे या पथकाचा संपूर्ण पाहणी दौरा गोपनीय ठेवण्यात आला. पथकाच्या आगमनापासून तपासणी पूर्ण होईपर्यंत प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यात आले. कोणत्याही अधिकार्याने तपासाबाबत अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे न्यायवैज्ञानिक अहवालात नेमके काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अग्निकांडानंतर राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडूनही स्वतंत्र चौकशी सुरू आहे. नवजात बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा उलगडा झाल्यानंतर जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे. न्यायवैज्ञानिक अहवालाच्या निष्कर्षावर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईची दिशा ठरणार आहे.





