नारदु गावाजवळ दुचाकी पुलाखाली कोसळली; दोघे गंभीर

सामाजिक कार्यकर्ते वाहिद खान धावले मदतीला

धारणी/11 सप्टेंबर – तालुक्यातील नारदु गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास अंधारामुळे दुचाकी थेट पुलाखाली कोसळून दोघे जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते वाहिद खान यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका चालक उज्ज्वल पांडे यांच्या मदतीने दोघांनाही तातडीने धारणी उपजिल्हारुग्णालयात दाखल केले असून वाहिद खान स्वतः रुग्णालयात थांबून उपचारासाठी मदत करत होते.तालुक्यातील नारदु गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्यावर अचानक अंधार दाटल्याने दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट पुलाखाली जाऊन आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही जण जबर मार लागल्याने पुलाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. रस्त्यावरून जाणार्‍या काही वाटसरूंनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी तात्काळ पुलाखाली उतरून दोघांनाही कसेबसे वर आणले. या घटनेची कुणकुण सामाजिक कार्यकर्ते वाहिद खान यांना लागताच त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे पोहोचून त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि सुसरदा येथील रुग्णवाहिकेला संपर्क साधला. माहिती मिळताच रुग्णवाहिकेचे चालक उज्ज्वल पांडे यांनी गाडी वेगाने घटनास्थळी आणली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेत चढवण्यात आले. वाहिद खान केवळ फोन करून थांबले नाहीत, तर ते स्वतःच्या वाहनाने रुग्णवाहिकेच्या मागे धारणी उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचले. दवाखान्यात दोन्ही जखमींवर उपचार सुरू होईपर्यंत ते डॉक्टरांशी बोलून मदत करत तिथेच उभे राहिले.अपघातातील दोन्ही जखमी हे नारदु गावातीलच रहिवासी असून त्यांच्यावर धारणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
माणुसकीचा खरा धर्म-अपघातात जखमी झालेल्या अनोळखी लोकांसाठी वाहिद खान यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली. स्वतः दवाखान्यात थांबून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. तसेच सुसरदा येथील रुग्णवाहिका चालक उज्ज्वल पांडे यांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून दोघांनाही वेळेत रुग्णालयात आणले. या दोघांच्या सतर्कतेमुळे जखमींना तातडीने उपचार मिळून दोघांचे प्राण वाचू शकले.

Back to top button