पीडब्युडी विद्युत विभागाची जबाबदारी निश्चित करा

जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणी

दोषींवर कठोर कारवाई करा, काँग्रेसची मागणी

अमरावती/11सप्टेंबर : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत निष्पाप चिमुकल्यांचा दुर्दैवी जीव गेल्यानंतर संपूर्ण जिल्हा सुन्न झाला असून या प्रकरणामागील प्रशासकीय व कंत्राटी पातळीवरील गलथानपणा समोर आला आहे.
या घटनेला केवळ अपघात मानून दुर्लक्षित न करता सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक जबाबदारी निश्चित करून दोषींवर तात्काळ कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पदाधिकारी समीर रामेश्वरराव जावंजळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, तारांची जोडणी, विद्युत दाब केंद्र, निगा राखणे आणि आग सुरक्षेची जबाबदारी ही पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाची विद्युत शाखा हाताळते. त्यामुळे आगीपूर्वी सुरक्षेची कोणतीही चाचणी झाली होती की नाही, याची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता रा. कु. शेंडे तसेच प्रभारी कार्यकारी अभियंता विनोद गऊळकर यांची निष्काळजीपणाबाबत विभागीय चौकशी करण्याची मागणी केली गेली आहे. याशिवाय, मे. साई बालाजी असोसिएट्स या कंत्राटदाराचा परवाना रद्द किंवा काळ्या यादीत असतानाही त्याला हे काम कसे मिळाले, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. नियमबाह्य रीतीने काम देणार्‍या अधिकार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यांचे तातडीने विद्युत व आग सुरक्षा लेखापरीक्षण करावे, असेही निवेदनात ठामपणे नमूद करण्यात आले आहे. निष्पाप बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोणाचीही गय न करता कडक कारवाई होणे हीच मृत बालकांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना समीर रामेश्वरराव जावंजळ यांच्यासोबत डव्होकेट कार्तिक देशमुख, अनिकेत जावरकर आणि डव्होकेट ऋतुराज मोरे प्रमुख उपस्थित होते.

Back to top button