ए.आय.माहिती देईल, पण विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य शिक्षकांकडेच
प्राचार्य डॉ. सी. एम. जाधव यांचे प्रतिपादन

अमरावती/11 सप्टेंबर: स्थानिक डॉ. राजेंद्र गोडे शैक्षणिक परिसर संचलित डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे शिक्षक दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.
महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. राजेंद्रजी गोडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. योगेंद्रजी गोडे व सचिव मा. तन्वी गोडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमात शिक्षकांचे जीवनातील स्थान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील त्यांची भूमिका यावर सखोल मंथन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सी. एम. जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, आपली पहिली गुरू आई आणि द्वितीय गुरू शिक्षक असतात. ’गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः’ या श्लोकाचा उल्लेख करत त्यांनी गुरुंचे स्थान अधोरेखित केले. तसेच भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग व पंचतंत्रातील कथेचा दाखला देत शिक्षकांचे मार्गदर्शनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खरी घडण देते, असे प्रतिपादन केले. उपप्राचार्य डॉ. एस. जी. जिरापुरे यांनी, आयुष्यात वाट लावणारे अनेक असतात, मात्र योग्य वाट दाखवणारे मोजकेच असतात आणि तेच खरे शिक्षक, अशा शब्दांत शिक्षकांचे महत्त्व स्पष्ट केले.प्राचार्यांनी एका विद्यापीठातील प्रयोगाचा दाखला देत स्पष्ट केले की, तंत्रज्ञान हे अभ्यासासाठी केवळ साहाय्यक साधन आहे; मात्र स्वतःची विचारशक्ती आणि आकलन क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनच अनिवार्य आहे. या सोहळ्याला स्टुडंट डेव्हलपमेंट कमिटीचे समन्वयक प्रा. एस. व्ही. गुल्हाने, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिव्हिल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी कु. निशा उंडे हिने केले.





