भाजप सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी
खा.डॉ. बोंडे आणि आ.प्रवीण पोटे पाटील यांची ग्वाही, दोन्ही नेत्यांच्या हातावर बहिणींनी बांधल्या राख्या

आ.प्रवीण पोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात
अमरावती /28 ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाने नेहमीच महिला सुरक्षा आणि सक्षमकरणावर भर दिला आहे. नुकतेच भाजप महायुती सरकारने ’लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून, त्याद्वारे थेट महिलांच्या हाती दरमहा 1500 रुपये पोहोचत आहेत, असा दावा खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आज दुपारी केला.
आ.प्रवीण पोटे यांच्या इर्विन चौकाजवळील जनसंपर्क कार्यालयात आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय जमला होता. संपूर्ण सभागृह तुडुंब भरले होते. महिलांमध्ये नेत्यांना रक्षासूत्र बांधण्याची आणि मिठाई भरवण्याची चढाओढ पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांनी (डॉ. अनिल बोंडे आणि प्रवीण पोटे) सांगितले की, भाजपचे केंद्र सरकार संसद आणि विधानसभेत महिलांना सन्मान व संधी देण्याच्या दृष्टीने 33 टक्के आरक्षणाचा कायदा घेऊन आले, परंतु विरोधी पक्षांनी तो बिल मंजूर होऊ दिले नाही; तरीही सरकार या बिलाच्या बाजूनेच आहे. महिलांना संसद आणि विधानसभेत सन्मानजनक संधी देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचे आमदार प्रवीण पोटे पाटील म्हणाले. तसेच डफरिन हॉस्पिटल घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली जाईल आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात डफरिन घटनेतील पीडितांनाही राखी बांधून भाजपच्या वतीने प्रत्येकी 1 लाख रुपयांची सानुग्रह मदत प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास आमदार प्रवीण पोटे, खासदार अनिल बोंडे, मनपा नेते चेतन गावंडे, राज्य सचिव जयंत डेहनकर, माजी सभापती चेतन पवार, शिवराय कुलकर्णी, संगीता शिंदे, संगीता बुरुंगे, नगरसेविका लता देशमुख, महिला अध्यक्षा सुधा तिवारी, सरचिटणीस नितीन गुडधे पाटील, राजेश साहू पड्डा, भावी महापौर आशिष अतकरे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि महिला-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




