डफरीनमध्ये भीषण अग्नितांडव; तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

39 पैकी 36 बालकांना वाचविण्यात यश, बंद लिफ्टसह सुरक्षेच्या व्यवस्थेवर संताप

आरोग्य विभागाच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र रोष

अमरावती/24 ऑगस्ट – ज्या डफरीन रुग्णालयात नवजात बालकांना नवजीवन मिळावे म्हणून उपचार सुरू होते, त्याच ठिकाणी सोमवारी पहाटे आगीने मृत्यूचे तांडव घातले. चौथ्या मजल्यावरील नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच धूर व आगीने संपूर्ण विभागाला वेढले. त्यावेळी तब्बल 39 नवजात बालके उपचार घेत होती. त्यापैकी 3 बालकांचा आगीत दुर्दैवी मृत्यू झाला, 6 बालके जखमी झाली, तर डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे 36 बालकांना वाचविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार श्वसनयंत्र किंवा त्याच्याशी जोडलेल्या विद्युत उपकरणातील बिघाडामुळे आग लागल्याचा संशय आहे. मात्र, नेमका दोष कुठे होता, सुरक्षा व्यवस्था का निष्प्रभ ठरली आणि बंद असलेल्या दोन लिफ्टांचा प्रश्न इतके दिवस का दुर्लक्षित राहिला, याची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने अमरावती गाठून परिस्थितीची पाहणी केली.
सोमवारी पहाटे रुग्णालयातील नवजात विभागात नेहमीप्रमाणे उपचार सुरू होते. काही बालके श्वसनयंत्राच्या मदतीने तर काही इतर जीवनरक्षक साधनांवर होती. अचानक मोठा आवाज झाल्यानंतर विभागात धूर पसरू लागला. काही क्षणांतच धुराचे लोट इतके वाढले की आत जाणेही कठीण झाले. परिस्थिती लक्षात येताच डॉक्टर आणि परिचारिकांनी वेळ न दवडता बालकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. एका बाजूला धुराने डोळ्यांसमोर अंधार होत होता, तर दुसर्‍या बाजूला यंत्रांमध्ये अडकलेली नाजूक बालके बाहेर काढण्याचे मोठे आव्हान होते.
परिचारिकांनी अक्षरशः जीव धोक्यात घालून धुराने भरलेल्या विभागात वारंवार प्रवेश केला. काही कर्मचार्‍यांनी काचा फोडून आत जाण्याचा मार्ग तयार केला. श्वसनयंत्राशी जोडलेली बालके काळजीपूर्वक वेगळी करून त्यांना बाहेर आणण्यात आले. काही बालकांना कडेवर घेऊन तर काहींना स्ट्रेचरवरून खाली नेण्यात आले. या धावपळीत काही मिनिटांचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरला. कर्मचार्‍यांच्या या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी 3 कुटुंबांच्या आयुष्यात मात्र कायमची काळी रात्र आली.
डफरीनच्या नवजात अतिदक्षता विभागात 3 स्वतंत्र विभाग असून प्रत्येक ठिकाणी सुमारे 13 बालकांच्या उपचाराची व्यवस्था आहे. दुर्घटनेच्या वेळी एकूण 39 बालके दाखल होती. ज्या विभागात आग लागली तेथे 9 ते 12 बालके उपचार घेत होती. त्यातील अनेक बालके मुदतपूर्व जन्मलेली होती. काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना श्वसनयंत्राची मदत दिली जात होती. त्यामुळे आगीसोबत धुराचा धोका अधिक गंभीर बनला होता. या दुर्घटनेत पूजा स्वप्निल बोरगे, पुलगाव, जिल्हा वर्धा यांच्या नवजात मुलाचा, गायत्री प्रफुल चोपडे, मुरखेड, तालुका अंजनगाव सुर्जी यांच्या नवजात मुलाचा आणि किरण गंगाराम बेठेकर, बोराला, तालुका चिखलदरा यांच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला. तीनही कुटुंबांच्या आनंदावर काही तासांतच दुःखाचे सावट आले. पुलगाव येथील स्वप्निल आणि पूजा बोरगे यांच्या कुटुंबाची अवस्था तर काळीज पिळवटून टाकणारी होती. आठव्या महिन्यात जन्मलेल्या त्यांच्या पहिल्या मुलाला उपचारासाठी डफरीनमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलगा झाल्याची आनंदाची बातमी स्वप्निल यांनी रात्री नातेवाईक आणि मित्रांना सांगितली. मात्र, सकाळ होण्याआधीच त्याच मुलाच्या मृत्यूची बातमी कुटुंबावर कोसळली. रुग्णालय परिसरात त्यांचा आक्रोश ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले. आगीची बातमी कळताच रुग्णालय परिसरात पालक आणि नातेवाईकांची गर्दी झाली. कोणाचे बाळ कुठे हलविले याची माहिती मिळत नव्हती, तर काही जण आपले बाळ जिवंत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. अनेक माता आणि नातेवाईक रडत होते. काही जण दुःखाने जागेवरच कोसळले. मृत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला. सुरक्षेची योग्य व्यवस्था असती तर हा अनर्थ टाळता आला असता, असा सवाल त्यांनी केला. बचावलेल्या 36 बालकांना तातडीने शहरातील विविध रुग्णालयांत हलविण्यात आले. अतिविशेषोपचार रुग्णालयात 5 बालके, मुरके रुग्णालयात 8, होप रुग्णालयात 6, पारिजात रुग्णालयात 2 आणि पीडीएमसी रुग्णालयात 11 बालकांना हलविण्यात आले. यातील 4 बालकांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना पालकांसोबत घरी पाठविण्यात आले.या घटनेनंतर रुग्णालयातील दोन बंद लिफ्टचा मुद्दा चांगलाच तापला आहे. चार मजली इमारतीतील दोन्ही लिफ्ट बंद असताना त्यांच्यासमोर जड लोखंडी बाक ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, पोलिस अधिकारी आणि रुग्णालय कर्मचार्‍यांना जिन्याने चौथ्या मजल्यावर जावे लागले. नवजात बालकांना कडेवर घेऊन खाली आणावे लागले. आपत्कालीन परिस्थितीत लिफ्ट बंद असणे ही बाबच रुग्णालयाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरली आहे. आता रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा नेमकी किती सक्षम आहे, विद्युत उपकरणांची नियमित तपासणी झाली होती का, अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली होती का, धूर ओळखणारी यंत्रणा सुरू होती का, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे होते का, या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. नवजात बालकांसारख्या अतिशय नाजूक रुग्णांना ठेवलेल्या विभागात सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही ढिलाई परवडणारी नाही. त्यामुळे या दुर्घटनेला केवळ तांत्रिक बिघाड म्हणून झटकून चालणार नाही, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे. यापूर्वीही भंडारा जिल्हा रुग्णालयासह देशातील अनेक रुग्णालयांमध्ये नवजात आणि अतिदक्षता विभागात आगीच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक घटनेनंतर सुरक्षा तपासणीचे आदेश दिले जातात. काही दिवस गोंधळ होतो आणि नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. डफरीनमधील दुर्घटनेने याच पद्धतीवर बोट ठेवले आहे. रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, श्वसनयंत्रे, प्राणवायूची व्यवस्था, धूर ओळखणारी यंत्रणा आणि आपत्कालीन मार्ग यांची काटेकोर तपासणी होणे आता अत्यावश्यक आहे. 3 नवजात बालकांचा जीव गेल्यानंतर अमरावतीकरांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे. हा केवळ अपघात होता की सुरक्षेतील दुर्लक्षाचा हा परिणाम होता? चौकशी अहवालात या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळाले पाहिजे. दोषी कोण असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण या दुर्घटनेत जीव गमावलेली बालके काहीच बोलू शकत नव्हती. त्यांच्या वतीने आता प्रश्न विचारण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि समाजाची आहे. डफरीनमधील या दुर्घटनेने आरोग्य व्यवस्थेतील उणिवा उघड्या पाडल्या असून चौकशीच्या नावाखाली हा विषय दडपला जाऊ नये, अशी संतप्त मागणी अमरावतीकरांतून होत आहे.बंद लिफ्टचा प्रश्न आता प्रशासनाच्या दारात-चार मजली डफरीन इमारतीतील दोन्ही लिफ्ट बंद असल्याने आग लागल्यानंतर बचाव पथकाला जिन्यानेच चौथ्या मजल्यावर पोहोचावे लागले. बालकांना कडेवर घेऊन खाली आणताना कर्मचार्‍यांची मोठी धावपळ झाली. आपत्कालीन प्रसंगी वापरता येणार्‍या लिफ्ट बंद का होत्या, त्यांची दुरुस्ती का झाली नाही आणि त्यासमोर अडथळे का ठेवले होते, याचा हिशेब आता प्रशासनाला द्यावा लागणार आहे.

Back to top button