लाडक्या बहिणींना मिळणार्‍या निकृष्ट दर्जाच्या साड्या

रेशन दुकानातील साड्यांमुळे महिलांमध्ये मोठी नाराजी

मोठी जाहिरातबाजी अन् हातात मात्र बोगस कापड

अमरावती /23 ऑगस्ट- राज्य शासनाच्या वतीने रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना रेशन दुकानांमधून धान्यासोबत साडी भेट देण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मिळालेल्या साड्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याने लाभार्थी महिलांचा संताप उफाळून आला आहे. ज्या साड्या अंगावर नेसण्यायोग्यसुद्धा नाहीत, अशा बोगस साड्यांची भेट देऊन सरकारने केवळ स्वतःचा प्रचार आणि जाहिरातबाजी केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. या साड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेत्यांची चित्रे छापून प्रसिद्धी केली गेली, पण प्रत्यक्षात साडीचा दर्जा मात्र अत्यंत भंगार निघाला. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस साड्या पुरवणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता लाडक्या बहिणींकडून केली जात आहे.
दर्यापूर तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये जेव्हा महिला साडी घेण्यासाठी पोहचल्या, तेव्हा सुरुवातीला त्यांच्यात प्रचंड उत्सुकता होती. परंतु साडी हातात पडताच त्यांचा पार हिरमोड झाला. मिळालेल्या साडीचा कापड इतका हलका आणि निकृष्ट आहे की, साडी नेसणे तर दूरच पण शेतात पिकांचे रक्षण करण्यासाठी कुंपणाला बांधण्याशिवाय तिचा दुसरा काहीच उपयोग उरलेला नाही, असा संतप्त सवाल स्थानिक महिलांनी केला आहे.
दुसरीकडे रेशन दुकानदारांचीही या वाटपामुळे मोठी अडचण झाली आहे. दुकानात ज्या साड्या शासनाकडून पाठवण्यात आल्या, त्या आम्हा दुकानदारांना नाईलाजाने महिलांना वाटाव्या लागत आहेत. महिला दररोज दुकानातयेऊन साड्यांच्या दर्जावरून तक्रारी करत आहेत, असे दुकानदारांनी स्पष्ट केले. सरकार कडून एकीकडे सन्मानाची भेट दिल्याचा मोठा गवगवा केला जात असताना, दुसरीकडे मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे कापड देऊन महिलांच्या भावनांशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यामुळे संपूर्ण दर्यापूर तालुक्यात आणि अमरावती जिल्ह्यात सध्या या साडी वाटपावरून मोठा गदारोळ माजला असून, या साडी खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नावालाच भेट, हातात मात्र शेतातील कुंपणाचे कापड
रक्षाबंधन सणाला सरकारकडून साडी भेट मिळणार म्हणून आम्ही महिला खूप आनंदाने रेशन दुकानात गेलो होतो. पण साडी हातात आल्यावर आमचा पुरता भ्रमनिरास झाला. साडीचा दर्जा इतका खराब आहे की ती अंगावर नेसता येत नाही. ही साडी नेसण्यापेक्षा शेतात कुंपणाला बांधायलाच योग्य आहे. एकीकडे नेत्यांचे मोठे फोटो छापून प्रचार करायचा आणि महिलांना मात्र अशी बोगस भेट द्यायची, हा आमचा अपमानच आहे.

संबंधित बातम्या

Back to top button