बडनेरा व लोणीत अवैध सावकारांच्या घरावर छापा

सहकार विभागाच्या चार पथकांची कारवाई

43 संशयास्पद दस्तऐवज, इसारचिठ्ठ्या, कोरे स्टॅम्प जप्त

अमरावती /20 ऑगस्ट- बडनेरा आणि लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर सावकारी करणार्‍यांवर सहकार विभागाने गुरुवारी धडक कारवाई केली. जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या चार विशेष पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकदम धाडी टाकल्या. या कारवाईत सावकारीशी संबंधित तब्बल 43 संशयास्पद दस्तऐवज, इसारचिठ्ठ्या, कोरे स्टॅम्प आणि शेतकर्‍यांचे 7/12 उतारे जप्त करण्यात आले आहेत.
सकाळी 10.40 च्या सुमारास धाड पथक क्र. 1 च्या प्रमुख आणि तिवसा सहाय्यक निबंधक प्रीती धामणे, दिपक गासे, चेतना कुचे, अमोल लोमटे, पंच सागर पेठे, हितेंद्र टवलार आणि बडनेरा पोलीस ठाण्याच्या कर्मचारी तिक्षा जाधव व दिपाली कारमारे यांनी सुभाष चौक येथील एका महिला गैरअर्जदाराच्या घरी धाड टाकली. दुपारी 2.45 वाजेपर्यंत चाललेल्या या झडतीत सावकारीशी संबंधित 34 संशयास्पद कागदपत्रे जप्त करून सील करण्यात आली.
तसेच पथक क्र. 2 चे प्रमुख चांदुर रेल्वे सहाय्यक निबंधक किशोर इंगळे, विश्वजीत काळे, उज्ज्वला मोहोड, अमित बनारसे, पंच आशीर्वाद सावरकर, रमन धोत्रे आणि पोलीस कर्मचारी कासम कालीवाले व निलेश बिजवे यांनी नवी वस्ती येथील कन्हैयालाल शर्मा यांच्या घरी छापा मारला. दुपारी 1.35 वाजेपर्यंत चाललेल्या झडतीत 9 संशयास्पद दस्तऐवज आणि 7/12 उतारे जप्त केले.
दरम्यान, पथक क्र. 3 चे प्रमुख नांदगाव खंडेश्वर सहाय्यक निबंधक सचिन पतंगे, आशिष भांडे, सुष्मिता सुपले, नंदकिशोर जवंजाळ, पंच सुधाकर पाटील, निलेश जोंधळे आणि पोलीस कर्मचारी इंद्रजीत राठोड व रहीम कालीवाले यांनी सुभाष चौकातील कन्हैयालाल शर्मा, मनोहरलाल शर्मा आणि आशिष शर्मा यांच्या घरी तपासणी केली. तर पथक क्र. 4 चे प्रमुख सहकार अधिकारी अविनाश महल्ले, महेश चक्रे, शिल्पा सातपुते, हरीभाऊ भुमरे, पंच उमेश काळे, कुणाल भुसारी आणि लोणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी निहाल राऊतीया व दिपाली भोंडे यांनी धानोरा जोग रोडवरील कन्हैयालाल शर्मा यांच्या शेतात (फार्म हाऊस) छापा मारला. या दोन्ही ठिकाणी पथकांच्या हाती काहीही लागले नाही. जप्त केलेल्या सर्व कागदपत्रांची महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 नुसार विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन व जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या मार्गदर्शनात सचिन पतंगे तपासणी करणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button