कॅन्सरच्या बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश
आंतरराज्यीय टोळीचे 18 आरोपींना अटक

दिल्ली-मुंबई-नवी मुंबईपर्यंत कनेक्शन
नवी दिल्ली/20 ऑगस्ट :दिल्ली-एनसीआर, मुंबई, नवी मुंबई आणि हैदराबाद, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानपर्यंत पसरलेल्या कॅन्सरच्या बनावट औषधांचा पुरवठा करणार्या रॅकेटचा दिल्लीच्या क्राइम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. कॅन्सरची बोगस औषधं पुरवणारी ही आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त करण्यात क्राइम ब्रांचला यश आलं आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील महागड्या औषधांची अवैध पद्धतीने खरेदी, साठा करणे, रिपॅकेजिंग करण्याचं काम ही टोळी करायची. या प्रकरणी आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.
दिल्ली क्राइम ब्रांचच्या अधिकार्यांनी एकाचवेळी दिल्ली आणि नवी मुंबईत धडक कारवाई केली. कॅन्सरच्या बनावट औषधांचा मोठा साठा जप्तही केला. या प्रकरणात 17 आरोपींना अटक केली. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि अवैध सप्लाय चेनमध्ये ते सामील असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
दिल्लीच्या अधिकार्यांनी या छापेमारीत एकूण 9 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात औषधांनी भरलेल्या 588 बाटल्या, तर 6 रिकाम्या बाटल्या, औषधे ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्या रिकाम्या 7 डब्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 3 हजार 21 यूनिट इतर औषधे जप्त करण्यात आली आहेत. या रॅकेटमधील 17 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
दिल्लीच्या गुन्हे शाखेने 11 जुलै रोजी सात पथके तयार केली. दिल्ली आणि नवी मुंबईत एकाच वेळी छापा टाकला. या छाप्यात 9 कोटींची औषधे, तसेच 50 लाख रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे हे बनावट औषधांचा पुरवठा करणारं नेटवर्क किती दूरपर्यंत पोहोचलं आहे याची माहिती समोर आली आहे. दिल्ली – एनसीआर, मुंबई , हैदराबाद, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये हे जाळे पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.




