57 तहसीलदार झाले उप जिल्हाधिकारी
तर 25 नायब तहसीलदार तहसीलदारपदी पदोन्नती

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
मुंबई /20 ऑगस्ट : महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्यातील 57 तहसीलदारांना उप जिल्हाधिकारी (गट-अ), तर 25 नायब तहसीलदारांना तहसीलदार (गट-अ) पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनातील एकूण 82 अधिकार्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार असून रिक्त पदांमुळे निर्माण झालेली प्रशासकीय अडचण कमी होऊन कामकाजाला गती मिळणार आहे.
सन 2025-26 च्या निवडसूचीनुसार एस-19 वेतनश्रेणीतील 57 तहसीलदारांना एस-20 वेतनश्रेणीतील उप जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. तर पूरक निवडसूचीनुसार 25 नायब तहसीलदारांना एस-14 वरून एस-19 वेतनश्रेणीत तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नत उप जिल्हाधिकार्यांची सविस्तर पदस्थापना सध्या सुरू
असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील काम पूर्ण झाल्यानंतर महसूल विभाग वाटप नियम, 2021 नुसार स्वतंत्र आदेशाने करण्यात येणार आहे. नायब तहसीलदारांच्या पदस्थापनांचे आदेशही स्वतंत्रपणे काढण्यात येतील. नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम मान्यतेची अट लागू आहे. तसेच उप जिल्हाधिकारीपदी पदोन्नत अधिकार्यांना पुढील पदोन्नतीपूर्वी संबंधित महसुली विभागात किमान तीन वर्षे सेवा करावी लागणार आहे.




